रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढू लागला आहे. नगर परिषदेने आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात सुसज्ज कोविड केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याबराेबर आवश्यक साहित्यांची जुळणी करण्यात येत आहे. त्यासाठी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, आरोग्य सभापती निमेश नायर, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे.
नगर परिषद रुग्णालयाची क्षमता ३० बेडरूमची असून, प्रथमत: वीस बेड्सची उपलब्धता केली जाणार आहे. या रुग्णालयात शक्यतो साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. काही खासगी डाॅक्टरांशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनीही रुग्णसेवेसाठी तयारी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे अनुभवी नर्सेस, वाॅर्डबाॅय, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आया यांची नियुक्ती करण्यात येणार असून, तीन शिफ्टमध्ये कर्मचारी विभागले जाणार आहेत. शिवाय रुग्णालयासाठी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर परिषद रुग्णालयाची इमारत सुसज्ज असून, त्याठिकाणी पाणी, विजेची व्यवस्था तसेच जनरेटर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. औषधे, इंजेक्शन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक रेफ्रीजरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांना दोन वेळचे जेवण, सकाळी चहा, नाश्ता, व सायंकाळचा चहा मोफत दिला जाणार असून, त्यासाठीही ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार असून, खर्च नगरपरिषद करणार आहे. रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी वेटिंग रूम किंवा बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असेल. मात्र, गंभीर रुग्णांना अन्यत्र हलविण्यात येणार आहे.
रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, सर्व सुविधांची उपलब्धता पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अजून त्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
...............
रुग्णालय सुरू करताना, सर्व सुविधा व साहित्यांची शंभर टक्के उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांचेे मार्गदर्शन घेण्यात येत असून, नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम त्यासाठी काम करीत आहे.
- निमेश नायर, आरोग्य सभापती, नगरपरिषदर, रत्नागिरी .