रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्याचेही ठरले होते. त्यामुळे राहुल पंडित यांचा राजीनामा घेऊन थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला शिवसेनेने सामोरे जावे की, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, यावरून सेनेत दोन गट पडले आहेत.
सन २०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक होणे सेनेला धोकादायक वाटते आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत पंडित यांना नगराध्यक्षपदावर मुदतवाढ मिळणार का, या चर्चेलाही उधाण आले आहे.३० सदस्य असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेत सध्या सेनेकडे १७ नगरसेवकांचे बळ आहे. राष्ट्रवादीकडे ६, भाजपकडे ५ व अपक्ष २ असे विरोधकांकडे १३ नगरसेवकांचे बळ आहे. रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. पदाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याबाबत ग्रामदेवतेच्या साक्षीने मार्ग काढण्यात आला.
बंड्या साळवी
नगराध्यक्षपदावर प्रथम २ वर्षांसाठी राहुल पंडित यांना संधी देण्याचे ठरले व त्यानंतर सेनेचे गटनेते बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरविण्यात आले होते.शिवसेनेत जे ठरते, त्याची अंमलबजावणी होते, हे याआधीही रत्नागिरीत दिसून आले आहे. उपनगराध्यक्ष असताना राहुल पंडित यांनी मुदत संपताच स्वत:हून राजीनामा दिला होता. नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित यांच्यासाठी शिवसेनेने ठरविलेला त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या डिसेंबर महिन्यात संपणार आहे.
त्यामुळे राहुल पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा आहे. मात्र, विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने पंडित यांना राजीनामा द्यायला लावून थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात सेनेतील एका गटाला धोका वाटत आहे.चांगले काम झाले नाही?ठरल्याप्रमाणे पंडित यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घेणे योग्यच आहे. रत्नागिरी शहर हा सेनेचा बालेकिल्ला असताना थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात कोणताही धोका नाही, असे सेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. थेट निवडणुकीला सामोरे जाण्यात काहीजणांना धोका वाटण्यामागे गेल्या दोन वर्षात चांगले काम झाले नाही, असे कोणाला वाटते काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे.विरोधी नगरसेवकांना आॅफरनगरपरिषदेतील सत्ताधारी सेनेच्या काही नेत्यांकडून विरोधकांमधील दोन नगरसेवकांना एका गुप्त बैठकीत मोठी आॅफर देण्यात आल्याची चर्चा आहे. दोनपैकी एकाला उपनगराध्यक्षपदाची आॅफर मिळाली आहे. तसेच या काळात नगराध्यक्ष पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारभार उपनगराध्यक्षांकडे ठेवण्याचीही खेळी आहे.
मात्र, नगराध्यक्ष केवळ दोन महिन्यांसाठीच सक्तीच्या रजेवर जाऊ शकतात. त्यामुळे केवळ उपनगराध्यक्षपदाची खुर्ची मिळविण्यात कोणतेही स्वारस्य नाही, असे या दोन्ही नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. या खेळीने नेमके काय साध्य होणार, याबाबतही तर्क वितर्क सुरू आहेत.