गुहागर : आयुष्यभर भीक मागून जगणे आणि अनाथांना जगविणे हाच आपला जीवनक्रम राहिला आहे. सासरबरोबरच माहेरच्यांनी हाकलून दिल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षापासून सर्वत्र भटकत असताना स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा मार्ग सापडला. गेली ५० वर्षे अनेक अनाथांना मांडीवर घेऊन जगताना हजारोंची माय होण्याचा आनंद मिळाला. जीवनात माझ्यावर ओढवलेल्या अती वाईट परिस्थितीमुळे मला ही संधी मिळाली, त्याचे मला जराही दु:ख नसल्याची भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.गुहागरमधील प्रसिध्द श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त गुहागर रंगमंदिरमध्ये १६ देशांचा जागतिक दौरा केलेल्या व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांची काळीज हेलावून सोडणारी ज्वलंत कथा व स्वानुभव ऐकण्याची संधी विश्वस्त मंडळाच्यावतीने समस्त गुहागरवासीयांना मिळाली. यावेळी देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अरूण परचुरे व मंडळींनी त्यांचा सन्मान केला.वयाच्या १०व्या वर्षी लग्न झाल्यानंतर पुढे निर्माण झालेला संघर्ष व त्यात पतीने आपल्या पोटच्या बाळावरून घराबाहेर काढल्याचा प्रसंग काळीज हेलावून सोडणारा होता. पुढे ८-१० दिवसांचे बाळ हातामध्ये घेऊन गावोगावी गाणी म्हणत भीक मागण्याचा सुरू झालेला प्रवास कर्नाटक, आंध्रप्रदेशसारख्या राज्यापर्यंत गेला. याचदरम्यान रेल्वेतून सुरू झालेला प्रवास, स्टेशनवर निवारा घेण्याची वेळ, स्मशानातील चितेवर भाकरी करून पोट भरण्याचा प्रसंग अशा अनेक गोष्टी त्यांनी हुबेहुबपणे शब्दातून उपस्थितांसमोर रेखाटल्या.या सर्व प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी मरण पत्करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याचवेळी आलेले मरण बाजूला करण्याचा ईश्वरी प्रयत्न यातून जीवनात स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यातूनच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊन हजारो अनाथांची माय होण्याचे भाग्य मला मिळाले.
हे करण्यासाठी प्रथम पोटच्या मुलीला अनाथ शाळेत ठेवण्याचा कठोर निर्णय मी घेतला. कारण इतरांना सांभाळताना आपली माया मुलांना देताना कोणावर अन्याय होऊ नये, हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे आज २०० जावई, ४९ सुनांची सासू, १७५ गायींची आई, ७५० विविध पुरस्कारांची मानकरी, ३ राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित होण्याचे भाग्य मला मिळाले. आज माझी पोटची मुलगीही माझेच कार्य पुढे नेत आहे, तर इतर सर्व मुले व मुली संस्थेच्या कार्याला हातभार लावत आहेत. माझे कार्य पाहून सासरच्या मंडळींनी ६-७ वर्षांपूर्वी माझा सन्मान केला, असे त्या म्हणाल्या.अनुभव कथनआयुष्यातील आपले अनुभव सांगताना त्यांनी संतांच्या ओव्यांनी सुरूवात करत उपस्थितांची मने जिंकली. जीवन काय आहे, याचा अर्थ सांगताना स्त्रीचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्यानंतर स्वत:च्या आईपासूनच झालेल्या अन्यायकारक वागणुकीचा पुढे नवरा व सासरच्या मंडळींकडून कसा त्रास झाला, हे सांगितले.