रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्याअंतर्गत आता राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प व्हावा व मनपरिवर्तन व्हावे, यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे.
राजापूर परिसरातही समितीला अटकाव करण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. सुकथनकर समितीचे गठन हे नाणार प्रकल्पाच्या प्रवर्तक आॅईल कंपन्यांनी गठीत केली असून, त्यामध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, माजी वित्त आणि पेट्रोलियम सचिव डॉ. विजय केळकर, प्राध्यापक अभय पेठे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचा समावेश आहे.आधी समर्थन व नंतर विरोध अशी भूमिका घेत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेनेकडून आता समितीच्या मुद्यावर कोणती भूमिका घेतली जाणार आहे, याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे. मात्र नाणार प्रकल्पाच्या विरोधात कार्यरत असलेल्या संघर्ष समिती व अन्य स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून समितीला तीव्र विरोध होत आहे.