राजापूर : शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आणि भावनिक राजकारण करून निवडणूका जिंकतात. जनेतच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे त्यांना काहीचं देणं घेणं नाही. शिवसेना संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करून वैयक्तीक हिमतीवर यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिले आहे.रत्नागिरी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ झाला. यानंतर निलेश राणे साखरीनाटे व नाटे दौऱ्यावर आले होते. साखरीनाटे येथील आपदग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर नाटे येथे नाटे नगर विद्यामंदिर येथे या विभागातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, नाटेचे माजी सरपंच रामकृष्ण धाक्रस, तालुका अध्यक्ष दीपक बेंद्रे, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर, समिर खानविलकर, वसंत पाटील, शरद घरकर संदीप बांदकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी राणे यांनी तुमच्या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणवली-वैभवावडी-देवगड विधानसभा मतदार संघातील आमदार नितेश राणे हे जर का आपल्या मतदारसंघात विकास करू शकतात, तर मग तुमचे आमदार राजन साळवी मागे का? नितेश राणे यांनी पर्यटन, रोजगार, वॉटरस्पोर्ट, फिरते सिनेमागृह, म्युझियम यांसारखी विकासाची कामे करून मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजन साळवींना मात्र मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी वेळ नाही. केवळ ठेकेदारी आणि टक्केवारी यातच त्यांचे लक्ष असल्याचा आरोपही राणे यांनी केला.खासदार म्हणून आपण ज्यांना निवडून दिले त्या विनायक राऊत यांना लोकसभेत धड बोलताही येत नाही अशी अवस्था आहे. लोकसभेत बोलताना गारा पडा, झपरा नही यासारखे शब्दप्रयोग करून मतदार संघाच्या अब्रुची लक्तरे ते वेशीवर टांगत आहेत.
विकासाचे यांना काहीचं देणं घेणं नाही, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून आणि भावनिक राजकारण करून हे निवडून येतात आणि आपण त्यांना निवडून देतो. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. आमदार राजन साळवींनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प १०० दिवसात रद्द करू अशी ग्वाही दिली होती, त्याचे काय झाले. प्रकल्प रद्द झाला काय? या प्रकल्पाबाबत आमच्या विरोधात राजकारण करून स्वत:चा राजकिय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शिवसेनने केल्याचे त्यांनी सांगितले.नाणार प्रकल्प हा केंद्र शासनाने आणला ना? मग दिल्लीत खासदार म्हणून विनायक राऊत काय झोपा काढत होते काय? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. नाणार होऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी तुम्ही, उद्योगमंत्री तुमचे, पर्यावरण मंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे आणि तरीही नाणार प्रकल्प आला कसा याचे जनतेला उत्तर द्या. उगीच मतांसाठी प्रकल्पाचे राजकारण करू नका असा घणाघातही राणे यांनी केला. प्रास्ताविक व सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष दीपक बें्रेद्रे यांनी केले.राजन साळवींनी काय केले?आमदार राजन साळवींनी आपल्या आमदारच्या दोन टर्म मध्ये आणि खासदार विनायक राऊत याने खासदारकीच्या साडेचार वर्षात किती विकास कामे केली? किती प्रदूषण विरहित कारखाने आणले, किती बेरोजगारांना रोजगार दिले? याचा जाब त्यांना विचारा.