मेहरून नाकाडे रत्नागिरी : नेपाळमधून भारतात आलेल्या बोहरा कुटुंबीयाने कामाच्या शोधार्थ नेवरे गाव गाठले. गावातील एका बागायतदाराकडे आंबा बागेत राखणीचे काम मिळाले. बागेत दिवस-रात्र राखणीचे काम सुरू होते.
प्रेमकुमार बोहरा हे स्वत: अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण देण्याचे ठरविले. मोठा मुलगा रमेश याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ६७.४० टक्के गुण मिळवले आहेत.नेपाळी बोहरा कुटुंबीय नेवरेत काम मिळाल्यानंतर बागेतच वास्तव्य करून राहिले. बागेच्या मालकाने छोटीशी झोपडी बांधून दिली आहे. इतक्या वर्षाच्या कालावधीत मराठी हिंदी मिश्रीत भाषा ते बोलण्यास शिकले आहेत. स्वत:चे शिक्षण कमी असले म्हणून काय झाले, मुलांना त्याने शिक्षित करण्याचे ठरविले.
गेली काही वर्षे ते इमानेइतबारे काम करीत असल्यामुळे मालकाने त्यांना कामासाठी ठेवून घेतले आहे. नेवरे जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये रमेशचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल, नेवरे येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. रमेश पहिलीपासून गावातील स्थानिक मुलांच्या संपर्कात असल्याने त्याचे मराठी चांगलेच सुधारले आहे. रमेशची शैक्षणिक प्रगती चांगली असून, त्याची वर्तणूक देखील उत्तम आहे.
खेळातही त्याला विशेष आवड आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी आहे. रमेशची धाकटी भावंडेदेखील शिक्षण घेत आहेत. बहीण आठवीला, तर भाऊ पाचवीत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे.आई-वडील मोलमजुरी करीत असल्याची जाण रमेशला आहे. त्यामुळे सुट्टीत तो वडिलांबरोबर बागेत मजुरीचे काम करीत असतो. रमेशची शिक्षणाची आवड वाढली असल्यामुळेच त्याने पुढे माँसाहेब मीनाताई ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेण्याचे ठरवले आहे.
बारावीपर्यंतचे शिक्षण तो नेवरे येथेच पूर्ण करणार आहे. पदवीधर व्हायची त्याची मनीषा आहे. नेवरे - कोतवडे मार्गावर शाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर तो बागेत राहतो. तो व त्याची दोन्ही भावंडे तेथून चालत शाळेत जातात. शाळेच्या सर्व उपक्रमात सहभागी होत असतात.शिक्षणाची कासकुटुंब नेपाळी असलं तरी मराठी माध्यमातून ही मुले शिक्षण घेत असून, ते कौतुकास्पद आहे. शाळा सुटल्यावर किंवा शाळेत येण्यापूर्वी सर्व भावंडे आई-वडिलांना कामात मदत करीत असतात. प्रेमकुमारने रमेशला शाळेत घातले. पाठोपाठ दोन्ही भावंडे शिक्षण घेत असून, कुटुंबाने शिक्षणाची कास धरली आहे.