दापोली : वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.चुकीच्या धोरणांमुळे तसेच दुर्लक्षित केल्याने सद्यस्थितीत काजू व्यवसाय आजारी अवस्थेत पोहोचला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील काजू व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या सर्व समस्या शासन दरबारी मांडून ठोस उपाय योजना करण्याकरिता काजू पिक समिती सदस्यांसह, शेतकरी, व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासमवेत अर्थमंत्री सुधी मुनगंटीवार यांच्या सोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा युवा नेते संदेश पारकर, राजश्री विश्वासराव, काजू उद्योजक हरिष कांबळे दापोली यांच्या सोबत काजू पिक समितीचे शिष्टमंडळ महाराष्ट्रराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सह्याद्री विश्रामगृहावर भेटले. यावेळी ऊर्जा आणि उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा उपस्थित होते.यावेळी झालेल्या सांगोपांग चर्चेअंती काजू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन योजनेतून ६ टक्के व्याज परतावा (६ टक्के इंटरेस्ट सबसिडी) देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, काजू उद्योगाच्या मूल्य वर्धित कर परातव्यापैकी २०१० पासूनची शासनाकडे प्रलंबित असलेली १५ टक्के रक्कम आठ दिवसात वितरित करण्याचे आदेश अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिले.
काजू प्रक्रिया उद्योगांनी त्यांना आवश्यक असणारी विजेची गरज अपारंपरिक स्रोताद्वारे म्हणजे सोलर प्रकल्प उभारून पूर्ण केल्यास सोलर प्रकल्पासाठी तब्बल ५० टक्के अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही देखिल मुनगंटीवार यांनी दिली.या बैठकीसाठी प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, काजू पिक समिती सदस्य अमित आवटे, मंदार कल्याणकर, संदीप गावडे, काजू उत्पादक शेतकरी साई नाईक, वेंगुर्ला येथील काजू कारखानदार दिपक माडकर, दादू कविटकर, धनंजय यादव, काजू उद्योजक अनिरुद्ध गावकर, कोल्हापूर कॅशु मॅनुफॅक्चरर अॅण्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन परब, शामराव बेनके, अभिषेक चव्हाण उपस्थित होते.