रत्नागिरी : हाफकीन संस्थेकडून औषध पुरवठ्यास विलंब होत असल्याने यापुढे हाफकीनकडून औषधे न घेता जिल्हा नियोजन मंडळांनी स्वखर्चाने ही औषधे जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावीत, असा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे.
रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपल्याकडे केलेल्या तक्रारीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांना होणार आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालयांसाठी दरवर्षी लागणारी सुमारे २५० कोटींची औषध खरेदी आता हाफकीनऐवजी अन्य ठिकाणांहून केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली.मागणी करूनही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला हाफकीनकडून औषधांचा पुरवठा वेळेत होत नसल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक प्रल्हाद देवकर यांनी आपल्याकडे केली होती. त्यांची ही तक्रार आपण राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे मांडली.
औषध पुरवठ्याचे कंत्राट हाफकीनकडे आहे. परंतु आता राज्यातील सर्वच जिल्हा नियोजन मंडळांना स्वखर्चाने थेटपणे ही औषधे तेथील जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून देता येणार आहेत. याबाबत १ आॅगस्टच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासन आदेश काढण्यात आला आहे, असे सामंत म्हणाले.६० वर्षीय ज्येष्ठांना एस. टी. पासवयाची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. प्रवासासाठी सवलतीचा पास मिळावा, असा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. याबाबत रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांच्या दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीत आपण हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आता ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना सवलत पास देण्याचा आदेश एस. टी.च्या प्रत्येक विभागाला शासनाकडून पाठविण्यात आला असून, याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असे सामंत म्हणाले.आमदार सामंत म्हणाले..रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दररोज पहाटे ४ वाजता मुंबईसाठी गाडी असावी. ही गाडी मुंबईत सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचेल व चार-पाच तासांचे काम आटोपून रत्नागिरीकरांना पुन्हा रात्रीपर्यंत रत्नागिरीत परतता येईल. ही मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली जाणार आहे.साडेचार लाख रुपयांमध्ये ५६० चौरसफुटांचे घर उपलब्ध करणारे प्री-कास्ट तंत्रज्ञान चेन्नईत विकसित झाले आहे. त्याचा अभ्यास दौरा म्हाडाकडून सध्या सुरू आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ५० मजली इमारत उभारणे शक्य होणार आहे.म्हाडाचे परदेश दौरे व अभ्यास दौरे यापुढे केवळ तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच असतील. राजकीय नेत्यांना दूर ठेवले जाईल.राज्यात म्हाडाकडून लॉटरीअंतर्गत २० लाखांमध्ये दिली जाणारी घरे १० लाखात देण्याचा प्रयत्न करणार. डोंबिवलीतील म्हाडाची घरे तयार असूनही लॉटरी लागलेल्या व १० टक्के रक्कम भरलेल्यांना ही घरे दाखविली जात नसल्याची तक्रार आल्यानंतर आता संबंधित बिल्डर मंगल प्रभात लोढा यांना संबंधितांच्या ताब्यात ही घरे देण्याची नोटीस बजावली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.