शोभना कांबळेरत्नागिरी : राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली.सध्या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत डिसेंबरअखेर स्वच्छ शहर हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत राज्यातील सर्व शहरांमध्ये सातत्य राहावे, या दृष्टीने राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गातील महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा मानला जाणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे तसेच शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविणे आणि स्वच्छ महाराष्ट्रमध्ये नागरिकांचा सांघिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने जागृती करणे, या उद्देशाने आता स्पर्धा आयोजित केली आहे.
स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत सहभागी होणे सर्व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींना बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अ, ब आणि क वर्गातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि दापोली, लांजा, गुहागर, देवरूख आणि मंडणगड या पाच नगरपंचायती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या नगरपरिषद अथवा नगरपंचायतींच्या अखत्यारीतील प्रत्येक शहरासाठी ही स्पर्धा बंधनकारक आहे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्ड या स्पर्धेत सहभागी होणार आहे.या कालावधीत अ, ब आणि क अशा तीनही वर्गांतील नगरपरिषदांची पाहणी मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. पाहणी करण्यासाठी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या स्तरावर त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करून वॉर्डची तपासणी करून घ्यावी. हा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.महानगरपालिका स्तरावर अ,ब, क आणि ड अशा वर्गांसाठी बक्षिसे दिली जाणार आहेत. अ व ब गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ५० लाख, ३५ लाख आणि २० लाख तर क व ड गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
नगरपरिषद स्तरावर अ, ब आणि क अशा तीन वर्गांसाठी देण्यात येणारी बक्षिसे : अ वर्गासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख. ब वर्गासाठी २० लाख, १५ लाख आणि १० लाख, क वर्गासाठी १५ लाख, १५ लाख आणि ५ लाख रूपये अशी देण्यात येणार आहेत.