रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे काम सुरू झाले आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातील ग्रामीण वाहतूक होणाºया ठिकाणची प्रवासी शेड तोडण्यात आली असून, दोन जेसीबी लावून याठिकाणी चर खोदाईचे सुरू असलेले काम काहीसे रेंगाळले आहे.
आघाडी सरकारच्या कारकिर्दीत बीओटी तत्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) रत्नागिरी बसस्थानक मंजूर करण्यात आले होते. बसस्थानकाच्या १७ कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. या कामाचे भूमिपूजनदेखील झाले होते. मात्र, सत्तांतरानंतर परिवहन मंत्रीपद दिवाकर रावते यांना मिळाले. त्यांनी रत्नागिरी बसस्थानकाचा बीओटी तत्वावरील प्रस्तावच रद्द केला व शासनाच्या माध्यमातून बसस्थानक बांधण्याचे निश्चित केले. एकाचवेळी त्यांनी राज्यातील काही बसस्थानकांना मंजुरी दिली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक, लांजा बसस्थानक, चिपळूण बसस्थानकाला मान्यता मिळाली. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकासाठी दहा लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. आराखडा निश्चितीनंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आराखड्यात काही बदल सूचवले.
त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी बसस्थानकाची ‘जी प्लस टू’ अशी नवीन इमारत होणार असून, त्यात व्यापारी गाळ्यांसह आरामदायी आसनव्यवस्था, प्लॅटफॉर्मसह चालक, वाहक, अधिकाºयांसाठी विश्रांती कक्ष व प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक सध्या रहाटाघर बसस्थानकामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे रहाटाघर बसस्थानकातून बस सुटल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकात येऊनच पुढे रवाना होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील जुनी शेड पाडून त्याठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. याठिकाणी सात ते आठ फूट खोदाई करण्यात आली आहे. मात्र, कठिण दगड लागणे अपेक्षित असताना अद्याप मऊ मातीच लागत असल्यामुळे खोदाईचा खर्च वाढला आहे. खोदाई बरोबर कॉलम टाकण्यासाठी फाऊंडेशन टाकणे गरजेचे आहे, त्याकरिताच्या वाढीव खर्चासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. परंतु, मे महिन्यात टाकले जाणारे हे कॉलम भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्यात पावसाचे पाणी साचून काम वाढण्याचीच शक्यता आहे. नियोजित कामासाठी ३० महिने निश्चित करण्यात आले असले तरी सध्या धीम्या गतीने सुरू असलेले काम पाहिले तर आणखी अवधी लागण्याची शक्यता आहे.
चिपळूण बसस्थानकाचे काम बºयापैकी गतीने सुरू आहे. मात्र, लांजा बसस्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेमध्ये रखडले आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णत: थांबले आहे. गेल्या ६८ वर्षांमध्ये रत्नागिरी बसस्थानकाचा टप्याटप्याने विस्तार झाला. १९५० साली राज्य परिवहन रत्नागिरी विभागाची स्थापना झाली. गेल्या ६८ वर्षात रत्नागिरी विभागाने यशस्वी वाटचाल केली आहे. राज्य परिवहन मुंबई प्रदेशातील रत्नागिरी विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे. रत्नागिरी विभागातील तीन बसस्थानकांच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, यातील चिपळूण बसस्थानकाचे काम सध्या झपाट्याने सुरू आहे. रत्नागिरी बसस्थानक खोदाईच्या कामात तर लांजा बसस्थानकाचे काम निविदा प्रक्रियेत रखडले आहे.