रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या जुन्या दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. १९२० सालापासून आतापर्यंतच्या दहा लाख दस्तऐवजांची नोंद संगणकावर करण्यात आली असून, त्यामुळे कोणतेही कागदपत्र आवश्यकतेनुसार एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या दस्तऐवज कक्षामध्ये अतिमहत्त्वाचे, महत्त्वाचे व सर्वसाधारण या श्रेणींमध्ये दस्तऐवजांची साठवण करण्यात आली होती. तरीही जुन्या कागदपत्रांची आवश्यकता निर्माण झाल्यास संबंधित कागदपत्र शोधण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागत होता. या कागदपत्रांच्या संगणकीय नोंदीमुळे आता वेळ वाया जाणार नाही.रत्नागिरी नगर परिषदेने याआधीच शहरवासीयांना पाणीपट्टी व घरपट्टी आॅनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याचा अजून पुरेपूर वापर नागरिकांकडून होताना दिसून येत नाही. तरीही हे प्रमाण समाधानकारक आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या जुन्या दस्तऐवजांची संगणकीय नोंद करण्यासाठी मुंबईस्थित खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कामासाठी ४० लाख खर्च आला असून, ४० माणसांनी हे काम पूर्ण केले आहे.
संगणक नोंदी करताना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागले. १९८५ दरम्यानचे काही दस्तऐवज नगर परिषदेत उपलब्ध नाहीत. मात्र, नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी जास्तीत जास्त दस्तऐवजांच्या नोंदीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली.