- मेहरून नाकाडे
रत्नागिरी : दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्या लगत अरबी समुद्रावर तीव्र दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शनिवारी ( दि. ३०) रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आरेवारे मार्गावर मार्ग फलक, होर्डिंग्स, झाडाच्या फांद्या, झाडे, नारळाच्या झावळा रस्त्यावर आल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.
शनिवारी रात्रीपासून पाऊस सतत सुरू होता. रविवारी सूर्यदर्शनच झाले नाही. अंधार दाटून मुसळधार पाऊस सुरू होता. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने विजेचा लपंडाव सुरू होता. आरेवारे येथील सुरूची झाडे रस्त्यावर आली होती. काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी फांद्या तुटल्या होत्या. बसणी येथे झाड तुटले होते. साखरतर येथेही झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर आल्या होत्या. गांजुर्डे येथेही झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. शिरगांव येथे शुभेच्छा फलक जमिनीवर आडवा झाला होता. आरेवारे मार्गावर पर्यटकांची वर्दळ सुरू असल्याने ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत झाडाच्या फांद्या दूर करत होते. आरेवारे, साखरतर येथे मात्र फांद्या रस्त्यावरच असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती.
मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. उद्यमनगर हायवे परिसरात रस्ता रूंदीकरण करण्यात आले असून रस्त्याची उंची वाढविण्यात आल्याने मुख्य रस्तयावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूकीला अडथळा येत होता. मात्र भर पावसात पाण्यासाठी मार्ग काढण्याचे काम सुरू होते. शिरगांव दत्तमंदिरासमोर मात्र पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वाराना पाण्याचा अंदाज घेत गाडी पळवावी लागत होती.