लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या व्यक्तींना लस देण्यात आली. मात्र, या मोहिमेत घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरचे वितरण करणारे बहुतांशी ‘डिलिव्हरी बाॅय’ या लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसमोर प्रश्नचिन्ह उभे आहे.
शहरातील चार गॅस वितरक एजन्सीज आहेत. त्यात मिळून सुमारे १४० डिलिव्हरी बाॅय दरदिवशी दारोदारी जाऊन गॅस सिलिंडरचे वितरण करत आहेत. सुरुवातीला खासगी रुग्णालयात लस उपलब्ध असताना, या एजन्सीजनी ४५ वयापुढील असलेल्या कर्मचाऱ्यांचे पैसे भरून लसीकरण करून घेतले. मात्र बहुतांशी कर्मचारी १८ ते ४४ वयोगटातील असल्याने त्यांना पहिली लसच अद्याप मिळालेली नाही. यापैकी काहीजण कोरोना पाॅझिटिव्हही झाले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्याही जीविताचा प्रश्न उभा आहे.
हे कर्मचारी अनेक घरांमध्ये जात असल्याने अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. त्यामुळे यात कुणी कोरोनाबाधित असेल, तर त्याच्यापासून या कर्मचाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांपैकी कुणी बाधित झाल्यास व्यवस्थापन तसेच नागरिक यांनाही कोरोनाचा धोका पोहोचणार आहे. त्यामुळे या सर्वांच्यादृष्टीने या पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लसीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.
मात्र, आतापर्यंत जेमतेम ५० कर्मचाऱ्यांनाच पहिली लस मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण ३० ते ४५ या वयोगटातील आहेत. मात्र, या वयोगटासाठी सध्या लसीचा अपुरा साठा असल्याने लस देणे बंद करण्यात आले आहे. ज्यांनी पहिली लस घेतली, त्यांना दुसरा डोस मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे हे कर्मचारी स्वत:ही कोरोनाबाधित होण्याचा किंवा प्रसारक होण्याचा धोका आहेच.
१० डिलिव्हरी बाॅय पाॅझिटिव्ह
शहरात चार गॅस वितरक एजन्सीज आहेत. पहिल्या लाटेपासून आतापर्यंत सुमारे १० डिलिव्हरी बाॅय कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे सिलिंडरचे वितरण करण्यासाठी ज्या घरात जातात, तेथील लोकांनाही कोरोनाचा धोका आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात कोरोनाबाधित व्यक्ती आल्याने या कर्मचाऱ्यांनाही धोका आहे.
डिलिव्हरी बाॅय म्हणतात....
आम्ही दरदिवशी अनेक घरात जाऊन सिलिंडर पोहाेचवत असतो. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला लस मिळणे गरजेचे आहे. आमची नावे प्रशासनाकडे आमच्या एजन्सीकडून पाठविली आहेत. परंतु अजूनही मला पहिली लस मिळालेली नाही.
- प्रशांत शिवगण, रत्नागिरी
आमच्यावर आमचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे आम्ही सुरक्षित असलो तरच आमच्या कुटुंबाचे पालनपोषण होणार. सध्या कोरोना वाढू लागल्याने काम करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्हालाही कोरोनावरील लस मिळणे आवश्यक आहे.
- प्रकाश नागले, रत्नागिरी
जबाबदारी काेणाची....?
गॅस सिलिंडरचे घरोघरी वितरण करणारे डिलिव्हरी बाॅय हे पहिल्या फळीतील कर्मचारी असल्याने त्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अशा कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांकडून लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हा प्रशासनाकडे आलेेले आहे. सध्या सर्वत्रच कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना लस मिळण्यात अडचण येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा प्रयत्नशील आहेत.
- ऐश्वर्या काळुसे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याने घरामध्ये गॅस सिलिंडर आला, तर त्यावर काही ग्राहक डेटाॅलसारख्या जंतुनाशकाचा स्प्रे करतात, तर काहींना लगेचच वापर करायचा नसेल, तर ते दोन - तीन दिवस सिलिंडर बाजूला ठेवून देतात, अशी माहिती काही डिलिव्हरी बाॅयकडून मिळाली.