प्रकाश वराडकररत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असतानाच पावसामुळे या कामाला १५ जूनपासून ब्रेक लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. पावसाळा संपेपर्यंत चौपदरीकरणासाठी कॉँक्रीटचा रस्ता बनवण्याचे काम बंद राहणार आहे. सध्याचा ७ मीटर रुंदीचा महामार्ग अपघातमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ महिन्यांच्या मुदतीत सर्व पुलांसह चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांना पूर्ण करावे लागणार आहे. २४ महिन्यांची ही मुदत डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ अशी आहे. पावसाळ्यात रस्ता कॉँक्रीटचे काम पूर्णत: बंद राहणार आहे. मात्र, या काळात महामार्गालगतची वृक्षतोड, चौपदरीकरणासाठी लागणारी खडी तयार ठेवणे, अन्य साहित्याची जमवाजमव करणे, यासारखी कामे ठेकेदारांना करता येणार आहेत.येत्या तीन महिन्यानंतर गणेशोत्सव येत असल्याने सध्याच्या ७ मीटर रुंदीच्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहाणे आवश्यक आहे. त्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत विचारता महामार्गावर जेथे खड्डे पडलेले आहेत, त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवण्यात आली आहे. ७ मीटर महामार्गाच्या दोन्ही बाजूने रुंदीकरणाअंतर्गत सपाटीकरण करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील वाहतुकीमुळे ही माती रस्त्यावर येऊन अपघात होऊ नयेत तसेच ७ मीटरचा रस्ता वाहनांना रात्रीच्या वेळीही दिसावा, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दगड वा रंगाने खुणा करण्यात आल्या आहेत. सूचनांप्रमाणे काम झाले नाही व अपघात झाले तर संबंधित ठेकेदारावर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपर्यंत चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रायगड जिल्ह्यातही चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली - लांजा टप्पावगळता अन्यत्र चौपदरीकरणासाठीचे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी विभागातील काम एमइपीकडे सोपवण्यात आले आहे. त्यांचे काम मंदगतीने होत आहे.अनेक ठिकाणी पुलांच्या कामाच्या गतीबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पुलांपासूनच सुरू झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पूल अर्धवट बांधून काम थांबले होते. संगमेश्वरमधील शास्त्री पुलाचे काम खूप काळ रखडले होते. बावनदमीसारख्या ठिकाणी पुलाच्या कामाची सुरूवातच नाही. त्यात आता पावसाळा सुरू झाल्यामुळे काम बंद होणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत महामार्गाचे रूंदीकरण होण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.७० टक्के काम पूर्णमहामार्ग चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडण्याचे काम रत्नागिरी विभागवगळता जिल्ह्यातील अन्य विभागामध्ये ६० ते ७० टक्के पूर्ण झाले आहे. रत्नागिरी विभागात वृक्षतोडीचे काम ४० टक्क्यांपर्यंत झाले आहे. पावसाळ्यात वृक्षतोडीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. वृक्षतोड झाल्यानंतर एका बाजूने महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. आता केवळ ३० टक्के वृक्षतोड बाकी असून, त्यानंतर काम वेगाने पुढे सरकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.सहा सल्लागार समित्याचौपदरीकरणाचे काम योग्यरित्या पूर्ण व्हावे, यासाठी सहा विभागांकरिता ६ ठेकेदारांप्रमाणेच ६ सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सहा विभागातील चौपदरीकरणाचे काम होणार आहे.पुलांच्या कामांनाही वेगमहामार्गावरील १४ पुलांचे काम मध्यंतरी बंद पडले होते. मात्र, हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात या कामाला ब्रेक लागणार आहे. डिसेंबर २०१९पर्यंत पुलांचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हे कामही आता वेगातच सुरु झाल्याचे दिसत आहे.जानेवारी २०२०मध्ये उद्घाटन होणार?महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण करण्याची अट ठेकेदारांना घालण्यात आली आहे. या कामाला आता कोणत्याही ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार नसल्याचे महामार्ग विभागाने बजावले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जानेवारी २०२० मध्ये चौपदरीकरणाचे उद्घाटन होणे अपेक्षित आहे.
महामार्गाच्या एका बाजूला साडेबारा मीटर रुंदी, तर दुसऱ्या बाजुला साडेबारा मीटर रुंदी राहणार आहे. दोन्ही रस्त्यांमध्ये अडीच मीटर रुंदीचा दुभाजक व त्यामध्ये शोभेच्या झाडांची लागवड होणार आहे. त्याशिवाय दोन्ही बाजुला वृक्षलागवड होणार आहे.