राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रिफायनरीविरोधात सुरु असलेला लढा यापुढेही एकजुटीने कायम ठेवू व हा विनाशकारी प्रकल्प रद्द करायला शासनाला भाग पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन सुरु असून, यापूर्वी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन रिफायनरी प्रकल्प कसा चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला होता.
त्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समिती व शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने राजापुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली.कोकणचा नाश होऊ नये, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करीत आहोत. त्यातूनच मागील काही दिवसात या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. आम्हाला कोणताही मोबदला किंवा पॅकेज नको आहे. आमच्या कोकणला अशा विनाशकारी प्रकल्पांपासून वाचवायचे आहे, अशा शब्दात वालम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.प्रकल्पग्रस्त १४ गावांतील ४२ हजार ५०० खातेदारांना बत्तीस दोनच्या नोटीस पाठवण्यात आल्या. पण, त्यातील अनेक खातेदारांना अद्याप नोटीसच मिळालेल्या नाहीत. मलादेखील ती मिळालेली नाही. एकाच खातेदाराला तर अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. गोठीवरे परिसरातील तीन खातेदारांना तब्बल सहाशेपेक्षा अधिक नोटीस धाडण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.