रत्नागिरीे, दि. २ : येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती.
माऊलीच्या रथाप्रमाणे फुलांनी सजवलेला विठोबाचा रथ आणि या रथाच्या चार किलोमीटर मार्गावर सुमारे पाच तास रेखाटलेल्या रांगोळीने रत्नागिरीकरांना अचंबित करून टाकले. ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची सजावट करणारे कलाकार विष्णू आवटे आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रंगावली कलाकार राजश्री जुन्नरकर यांच्या अदाकारीने रत्नागिरीकांनाही त्यांच्या मोहात पाडले. कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी रात्री या उपक्रमाचे आयोजन केले होते.
प्रतिपंढरपूर मानले जाणाºया रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराला तीनशे वर्षांची परंपरा आहे. यावर्षीचा उत्सव आगळावेगळा करण्यासाठी विठ्ठल मंदिर देवस्थान व विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाने विशेष कार्यक्रम आखला होता. त्यासाठी आवटे व जुन्नरकर यांना रत्नागिरीत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार या दोघांनीही रत्नागिरीत उपस्थित राहून आपल्या कलेचे दर्शन दाखविले.
रंगावलीकार राजश्री जुन्नरकर यांनी सायंकाळी ७.३० वाजता मंदिरात विठोबाचा सुमारे दहा फुटी रांगोळी साकारण्यास प्रारंभ केला. ९.३० वाजता ही रांगोळी पूर्ण झाली. रात्री ११.३० वाजता मंदिरातून विठोबाचा रथ निघाला. हॉटेल प्रभा, धनजी नाका, राम मंदिर, तेली आळी, मारुती आळी व पुन्हा विठ्ठल मंदिर या मार्गावर पहाटे पाच वाजेपर्यंत रथाने नगर प्रदक्षिणा केली.
रथाच्या समोर राजश्री जुन्नरकर यांनी रांगोळी काढण्यास सुरूवात केली. सुमारे चार किलोमीटरच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटून रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेतले. रंगावली उपक्रमाची जबाबदारी राजा केळकर यांनी व रथ सजावटीसाठी नगरसेवक राजू तोडणकर यांनी विठोबाची सेवा करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली होती.
आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी
शोभिवंत, नक्षीदार, पट्टा, गालिचा, मोर, फुले, तुतारी वाजवणाऱ्या युवती, डफ वाजवणारे युवक अशा विविध रांगोळ्या जुन्नरकर यांनी साकारल्या. यासाठी ५०० किलो पांढरी रांगोळी व २०० किलो रंगीत रांगोळी लागली. जुन्नरकर यांचे कौशल्य, तसेच त्यांनी न बसता वाकून काढलेल्या या रांगोळ्यांचे रत्नागिरीकरांनी कौतुक केले. कोणाच्याही मदतीशिवाय तिने या रांगोळ्या साकारल्या.
आषाढी वारीला आळंदीत माऊलींचा रथ विष्णू आवटे सजवतात. येथे विठोबाचा रथ सजवण्यासाठी त्यांनी तब्बल २५० ते ३०० फुले वापरली. झेंडू, जरबेरा, गुलाब, शेवंती, मोगरा, तुळशी आदी नानाविध प्रकारची फुले सजावटीसाठी वापरली. विठोबासाठी खास हार त्यांनी साकारला. सजावटीसाठी त्यांनी सुमारे चार तासांची मेहनत घेतली.