रत्नागिरी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६४ नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने त्याचा परिणाम ८५ वाड्यांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. या नळपाणी योजनांची पाणीपट्टी ही दुरूस्तीच्या खर्चापेक्षाही कमीच असल्याने ही दुरूस्ती आता जिल्हा परिषदेला डोईजड होऊ लागली आहे. ऐन पाणीटंचाईच्या तोंडावर या योजना नादुरूस्त असल्याने आता तेथे टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे.जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे आजही लाखो लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांतील वाड्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले होते. नळपाणी योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात ही गैरसोय दूर करण्यात आली होती.
मात्र, नळपाणी योजनांच्या दुरुस्तीकडे गेल्या वर्षीपासून दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या प्रमाणापेक्षा जास्त नादुरूस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे तिन्ही हंगामात पाण्यासाठी हाल होतात.नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.
त्यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड सुरु असते. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो योजना नादुरुस्त आहेत. जिल्ह्यातील ६४ पाणी पुरवठा योजना दुरुस्त करण्यात येणार आहेत.वसुलीपेक्षा खर्चच जास्तग्रामीण भागातील नळपाणी योजनांच्या पाणीपट्टीतून जिल्हा परिषदेला कमी प्रमाणात महसूल मिळतो. तरीही पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पाणीपट्टी वसुलीपेक्षा हा खर्च जास्त असतो.आराखड्यात दुरूस्तीची कामेनळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने त्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होत्या. पाण्यासाठी लोकांचेही हाल होत असल्याने पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यांच्या दुरुस्तीची कामे घेतली आहेत.