राजापूर : तालुक्यातील कोंड्ये येथील धरणाच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजापूरतर्फे केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. सोमवार दि. १७ डिसेंबरपासून नवीन पाईपलाईन टाकून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कोंडये येथे उन्हाळी शेतीसाठी तसेच इतर वापरासाठी कोंडये येथील लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या धरणातून दरवर्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर ग्रामस्थ उन्हाळी शेती करतात. तसेच गावात धरणाचे पाणी आल्यावर गावातील विहिरींची पाणी पातळी देखील व्यवस्थित राहते. परंतु यावर्षी मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
गावात पाणीपुरवठा करणारी महामार्गानजीकची लोखंडी मुख्य जलवाहिनी महामार्गाचे काम करणाऱ्या केसीसी कंपनीने ग्रामस्थांचा विचार न घेता काढून टाकली. यामुळे यंदा कोंडये येथील ग्रामस्थाना पाणीपुरवठा बंद झाला. धरणाचे गावात पाणी येत नसल्याने यावर्षी उन्हाळी शेती झाली नाही तसेच पाणी येत नसल्याने गावातील विहिरींची पाणीपातळी देखील घटली आहे.
यामुळे कोंडये ग्रामस्थांसमोर पाणीसंकट उभे राहिले आहे. येथील ग्रामपंचयातीमार्फत या कंपनीला याबाबत सूचना देण्यात आली होती. परंतु त्याकडे देखील केसीसी कंपनी दुर्लक्ष्य करून अद्याप कोणतेही पाऊल उचलले नव्हते.अखेर कोंडये येथील स्वाभिमान पक्षाचे संतोष धूरत, प्रशांत मोंडकर यांनी याची माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे राजापूर तालुका अध्यक्ष हनिफ काझी यांना दिली आणि कोंडये गावावरील पाणीसंकट सोडवण्याची मागणी केली.याची दखल घेऊन स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष हनिफ काझी, रत्नागिरी जिल्हा सचिव दीपक बेंद्रे, विलास पेडणेकर यांनी हातीवले येथील केसीसी कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना घेऊन भेट दिली. या संदर्भात येथील प्रोजेक्ट मॅनेजर शर्मा, अधिकारी पांडे, सरवण यांना जाब विचारला.
यावेळी या अधिकाऱ्यांनी सोमवार दि.१७ डिसेंबर २०१८ पासून नवीन जलवाहिनीचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या जलवाहिणीचे काम व्यवस्थितरीत्या व चांगल्या प्रतीचे करणार असून त्यासाठी चेन्नईहून पाईप मागविल्याचे सांगितले. यावेळी कोंडये येथील स्वाभिमान पक्षाचे संतोष धुरत, प्रशांत मोंडकर, प्रितम धुरत, संकेत खोडे, हर्षद शिंदे, आदित्य देसाई उपस्थित होते.सोमवारपासून नवीन जलवाहिणीचे काम सुरु न झाल्यास मंगळवारपासून महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी तालुका अध्यक्ष हनिफ काझी, जिल्हा सचिव दीपक बेंद्रे आणि विलास पेडणेकर यांनी दिला.
यावेळी कोंडये येथे महामार्गावरील नवीन पुलाजवळ गतिरोधकाची मागणी स्वाभिमान संघटनेच्या संतोष धूरत आणि प्रशांत मोंडकर या कायकर्त्यांनी केली. यावेळी अधिकाºयांनी त्वरित गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिले.