रत्नागिरी : ३१ डिसेंबर आणि नाताळची सुटी साजरी करण्यासाठी अनेकजण रत्नागिरीत दाखल हाेत आहेत. या पार्श्वभूमीवर पाेलिस यंत्रणा सतर्क झाली असून, पाेलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी सुरू केली आहे.
नाताळची सुट्टी आणि थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण शनिवारपासूनच रत्नागिरीत दाखल झाले आहेत. ३१ डिसेंबरनिमित्त कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात येत आहे. काहीजण माैज-मजा करण्यासाठी वाहने घेऊन येत आहेत. या काळात काेणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला गालबाेट लागू नये यासाठी पाेलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. नाकाबंदीसाठी पाेलिसांनी ठिकाणे निश्चित केलेली नसून काेणत्याही ठिकाणी पाेलीस वाहनांच्या तपासणीसाठी उभे राहणार आहेत.
सध्या सुटीसाठी पर्यटक रत्नागिरीत दाखल हाेत आहेत. त्यांच्या उत्साहाला काेठेही गालबाेट लागू नये, याची खबरदारी पाेलीस घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी ३१ डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
विनीतकुमार चाैधरी,पाेलीस निरीक्षक, रत्नागिरी.