रत्नागिरी : प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे.
त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकांतर्फे प्रमाणपत्र, बिल्ला, आणि सन्मानपत्र देऊन फरीदाबाद येथे नुकतेच गौरविण्यात आले आहे. ही माहिती कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुस्तकात समावेश झालेले कांबळी हे कोकणातील एकमेव होत. २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळच्या रत्नागिरी कार्यालयात कांबळी सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. येत्या एप्रिल अखेर ते सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, नोकरी करतानाच त्यांनी प्रारंभापासूनच आपला शब्दकोड्याचा छंद तितक्याच तन्मयतेने जोपासला आहे.
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, विविध मासिके यांमधून काबळी यांची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. ६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१० या कालावधीत त्यांनी १६३९ आडवे, १५८६ उभे असे एकूण ३२२५ शब्द असणारे दहा हजार शब्दांचे भले मोठे कोडे बनविले होते. त्याची दखल २०११ साली लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने घेतली होती.भव्य अशा या शब्दकोड्याची दखल इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकानेही घेतली आहे. भारतीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या कर्तबगारीची नोंद या विक्रमविषयक पुस्तकात केली जाते. आत्तापर्यंत या पु्तकाच्या १८ आवृत्ती प्रसिद्ध झाल्या असून २०१८ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आवृत्तीत कांबळी यांच्या विक्रमाची नोंद होणार आहे.
त्यांच्या या विक्रमाला मान्यता देणारे विक्रमवीर म्हणुन ओळखपत्र, स्मृतीचिन्ह आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाची प्रत देऊन या प्रकाशकांतर्फे कांबळी यांना गौरविण्यात आले.नावाप्रमाणेच प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले कांबळी हे परोपकारी वृत्तीचे असून गेली ३४ वर्षे ते मोफत वधुवर सूचक मंडळ चालवीत आहेत. त्याचबरोबर कोकणचे प्रसिद्ध असलेले उकडीचे मोदक बनविण्यात त्यांचा विशेष हातखंडा असून वयाच्या ६ व्या वर्षापासून ते मोदक बनवीत आहेत. त्यांच्या या विविधांगी कार्याची दखल अनेक संस्थांनी घेत त्यांचा गौरव केला आहे.