रत्नागिरी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहरालगतच्या कुष्ठरोग वसाहतीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी या भागाची पाहणी करून स्वच्छतेविषयी माहिती घेतली. यावेळी तेथील रूग्णांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहरालगतच्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या उद्यमनगर येथील कुष्ठरोग वसाहतीला भेट दिली. यावेळी त्यांनी वसाहतीतील घरांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्यांनी तेथील कुष्ठरोग रुग्णांशी संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेतल्या. वृद्ध महिलांना औषधे वेळेवर मिळतात का? त्यांच्या पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे, त्यांची घरे कशाप्रकारची आहेत, सांडपाण्याचा निचरा होतो का आदींसह विविध समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी तेथील अनेक रहिवाशांनी आपल्या राहत्या इमारती पडण्याच्या स्थितीत आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिले.परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव होत असून, त्याचा त्रास रुग्णांना होत असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे तसेच परिसराची साफसफाई करताना या परिसराला वेढलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली. येथील महिलांनी, रुग्णांनी मिळणाऱ्या औषधोपचारांविषयी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रालाही भेट दिली. या केंद्राची पाहणी करताना तेथील परिसराचीही त्यांनी पाहणी केली.मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने अचानक भेटजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉनिंग वॉकच्या निमित्ताने अनेक कार्यालये, परिसर यांना अचानक भेट देत तेथील पाहणी करण्याची मोहीम राबविली असल्याने अचानकच्या या भेटीमुळे त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती येऊ लागली आहे. एरव्ही जिल्हाधिकारी यांचा दौरा नियोजित असला की, तेवढ्यापुरते चांगले असल्याचे भासविले जायचे. मात्र, आता याला चांगलाच चाप बसू लागल्याने सामान्य जनता समाधान व्यक्त करीत आहे.
या दौऱ्यामुळे अधिकारी मात्र हबकले आहेत. अधिकाऱ्यांचा आत्तापर्यंतचा दौरा बंद गाडीतून होत असल्यामुळे रस्त्यांची स्थिती कळत नव्हती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या मॉर्निंग वॉकमुळे ओसवालनगर ते उद्यमनगर रस्त्याच्या साईडपट्ट्या तसेच गटारे आणि रस्त्यावर टाकलेला प्लास्टिक तसेच इतर वस्तूंचा कचराही समोर आला आहे.