रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या त्यांना नोकऱ्या देण्याऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी, आपली तुंबडी भरून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र येऊन हा धडा शिकवूया. प्रकल्पग्रस्त शेतकरी कोकण रेल्वे प्रशासनाला सळो की पळो करून सोडतील, असे प्रतिपादन कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी व्यक्त केले.रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जाहीर सभा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. ही सभा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेला कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम, सचिव अमोल सावंत, सहसचिव प्रभाकर सहदेव हातणकर, प्रतीक्षा सावंत, लांजा महिला संघटक भिंगार्डे, राजापूर तालुका संघटक यश भिंगार्डे, सिंधुदुर्गचे प्रतिनिधी पांडुरंग सुतार, मुरारी पेडणेकर हे उपस्थित होते. कृती समितीचे समर्थक श्री. विनय लुबडे हे मुंबईहून या सभेला उपस्थित राहिले होते.अमोल सावंत यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व उमेदवारांमध्ये कोकण रेल्वेने असिस्टंट स्टेशन मास्तर, गुडस गार्डस साठी परीक्षा दिलेले तसेच ह्यडीह्ण ग्रुपची परीक्षा दिलेले परंतु आजपर्यंत त्यांना निकालासंदर्भात काहीच कळविलेले नाही असे अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.कृती समितीचे कार्याध्यक्ष विनायक मुकादम म्हणाले की, कोकण रेल्वे प्रशासनाने ०३/२०१८ च्या अधिसुचनेनुसार असिस्टंट स्टेशन मास्तर, गुड्स गार्डस इत्यादी केवळ १२५ पदांसाठी निव्वळ कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधून आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार होते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना खुली करून ऑनलाईनद्वारे अर्ज तसेच परीक्षा झाल्या. परंतु दुर्दैवाने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांमधील एकही उमेदवार न घेता परप्रांतीय, परजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तेतर उमेदवारांनाच कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी जास्त प्राधान्य दिले आहे, असे सांगितले.कृती समितीचे सहसचिव प्रभाकर हातणकर यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयात मुख्य कार्मिक अधिकारी ठाकूर यांचेसमवेत झालेल्या बैठकीत हे उमेदवार जर का बाहेरचे आहेत म्हणजेच प्रकल्पग्रस्तेतर आहेत असे आढळले तर आम्ही त्यांना बाहेर काढू, असे सांगितले होते. परंतु आता ह्या अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.