रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली.
घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आंदोलकांना स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने रेल रोको होऊ शकले नाही. याबाबत ९ मे २०१८ रोजी समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांची बेलापूर मुख्य कार्यालयात बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.कोकण रेल्वेच्या नोकरीत प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी कोकण भूमी कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली कोकण रेल्वेचे अधिकारी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता, खासदार विनायक राऊत, माजी खासदार नीलेश राणे व अन्य लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. त्यामुळेच कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या ८ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरीत झालेल्या बैठकीत रेल रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सोमवार सकाळपासून रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त विविध वाहनांनी रत्नागिरीत दाखल झाले. प्रकल्पग्रस्त आंदोलकांची रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर मोठी गर्दी झाली. रेल रोकोसाठी ट्रॅकवर जाण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धरले. त्यामुळे आंदोलकांनी स्थानकासमोरच निदर्शने सुरू केली. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, यांसारख्या घोषणांनी स्थानक परिसर दणाणून गेला.त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांचे शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांची रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. चर्चेत कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण व अन्य पदाधिकारी, आंदोलनाला पाठिंबा देणारे बसपाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र आयरे, कॉँग्रेसचे नेते अशोक जाधव यांचा सहभाग होता.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास पनवेल ते सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावर रेल रोको करण्यात येईल, असा इशारा अशोक जाधव यांनी बैठकीमध्ये दिला.रेल रोको आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची कुमक वाढविण्यात आली होती. रेल्वे पोलीस, रत्नागिरी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.