सागर पाटीलटेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे.
सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणारे शिक्षक अक्षरश: जीव धोक्यात घालून ही वाहतूक करतात. पोलीस यंत्रणेकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. परंतु, शासनस्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची वाहतूक सुरक्षा राम भरोसेच असल्याचे दिसत आहे.राज्यातील विभागीय शिक्षण मंडळांतर्गत कार्यान्वित असणाऱ्या परीरक्षक कार्यालयााला प्रश्नपत्रिकेचे वितरण व उत्तरपत्रिकेचे संकलन परिस्थितीचे गांभीर्य पटते. परंतु शासन स्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या शासन स्तरावरुन सोडवणे आवश्यक असल्याने शासन निर्णयाची वाट पाहण्याचे काम मंडळ स्तरावरुन केले जात आहे.प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मंडळ स्तरावरुन एका मार्गावरील केंद्रासाठी प्रत्येकी एक सुरक्षित वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मंडळ नियमावलीनुसार ही वाहतूक एस. टी. बसमधून होणे आवश्यक आहे. परंतु वेळ व एस. टी.ची वाहतूक व्यवस्था पाहता सर्वच केंद्रांना ही बाब लागू पडत नाही.
या वाहतूक व्यवस्थेबाबत कोकण विभागीय मंडळांतर्गत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंडळ व शासनाला असल्याचे विभागीय मंडळातून सांगण्यात येते. परीक्षेदरम्यान गोपनीयतेला प्राधान्य देणाऱ्या राज्य मंडळाने या वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मोटारसायकलवरून वाहतूकरत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या माध्यमातून राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करता मोटरसायकलवरुन पेपरची वाहतूक करणे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केले.
याबाबत अध्यापक संघाच्यावतीने राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल, असे डॉ. काळे यांनी सांगितल्याचे घुले म्हणाले.