विहार तेंडुलकररत्नागिरी : रत्नागिरीचा कॅलिफोर्निया होण्यापूर्वीच रत्नागिरीकरांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसू लागला आहे. बाराही महिने तिन्ही मुख्य ऋतुंचा आभास होत असल्याने आता या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात अनेक आजारांची वाढ होत आहे. वाढते शहरीकरण, निसर्गावर चालवलेली कुऱ्हाड या प्रमुख कारणांमुळे २००५ नंतर रत्नागिरीचे तापमान आणि वातावरण कमालीचे बदलत आहे. त्याचा परिणाम लोकजीवनासह प्राण्यांवर आणि येथील पिकांवरही झाला आहे.वाढते शहरीकरण, वृक्षतोड, सिमेंटची बांधकामे, निसर्गाची होणारी हानी, वाढते प्रदूषण या कारणांमुळे रत्नागिरीचे सरासरी तापमान गेल्या बारा वर्षात कमालीचे वाढले आहे. यापूर्वी पाऊस कधी पडेल, इथंपासून ते अगदी मच्छी कोणत्या क्षेत्रात मिळेल इथपर्यंत अंदाजावर बाबी चालत होत्या. काही ठराविक लक्षणे दिसली की, त्यावरून आडाखे बांधले जात होते.मच्छीमारीबाबत बांधण्यात येत असलेल्या आडाख्यांबाबत बोलताना नजीकच्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्वप्नजा मोहिते म्हणाल्या की, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या माहितीचा मच्छीमार आपल्या मासेमारीसाठी प्रभावीपणे उपयोग करतात.
मासे कुठे मिळतील, केव्हा मिळतील हे जसे ते अचूक ओळखतात तसेच मासेमारीसाठी कधी जावे आणि कोणता वारा मासेमारीसाठी योग्य हे ते आपल्या पारंपरिक ज्ञानाचा वापर करून ठरवत असतात.
आपल्याकडे तांत्रिक साधने येण्याअगोदरपासून आपल्या किनारपट्टीवरील मासेमार या ज्ञानाच्या आधारे उत्तमप्रकारे मासेमारी करतच होता. काही आडाखे किंवा निष्कर्ष आपल्या सततच्या निरीक्षणातून त्यांनी मांडले होते आणि ही माहिती मौखिक पद्धतीने पुढच्या पिढीकडे दिली जात होती. हे सगळे आडाखे आपण शास्त्रीय निकषांवर पडताळून पाहू शकतो.मासे काहीशा गढूळ पाण्यात मिळण्याची शक्यता अधिक असते हा मासेमारांच्या एक आडाखा. जेव्हा पाण्यात माशांच्या खाद्याची म्हणजे प्लवंगांची मोठ्या प्रमाणावर वाढ होते तेव्हा मासे त्याठिकाणी खाद्य खाण्यासाठी गोळा होतात. प्लवंगांमुळे पाण्याचा रंग गढूळ होतो आणि तेथे मासे मिळतात हे शास्त्रीय सत्य आहे.
भरतीच्या वेळेस डोलसारख्या जाळ्याला जास्त मासा मिळतो, चंद्राच्या कलांचा आणि मासेमारीचा संबंध आहे आणि त्यानुसार डोल जाळे, कल्ली जाळे किंवा इतर जाळी केव्हा वापरायची हे मच्छीमार ठरवतात. समुद्राच्या पाण्यावर फेस दिसू लागला किंवा गढूळपणा वाढला तर पाऊस येणार, असे ते भाकीत करतात. मात्र, बदलत्या वातावरणाने या साऱ्याला छेद दिल्याचे त्यांनी सांगितले.पारंपरिक ज्ञानाला काहीसा छेद
हवामानातील बदल मच्छीमारांच्या पारंपरिक ज्ञानाला काहीसे छेद देणारे ठरत आहेत. आता पावसाळा ठरल्याप्रमाणे जून महिन्यातच सुरु होईल असे नसते आणि तो अगदी पार नोव्हेंबरपर्यंत किंवा डिसेंबरमधल्या अवकाळी पावसापर्यंत रेंगाळतो. त्यामुळे मासळीच्या अंडी घालण्याच्या कालावधीवर परिणाम झाला आहे. बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी प्राणवायू कमी झालेली क्षेत्रे निर्माण होऊ लागली आहेत तर काही ठिकाणी वाढलेल्या कार्बन डायआॅक्साईडमुळे वनस्पती प्लवंग आणि पयार्याने प्राणी प्लवंगांची निर्मिती झाल्याचे आढळत आहे. याचा परिणाम मासळीच्या उत्पादनावर होत आहे.- स्वप्नजा मोहितेप्राध्यापिका, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी
तापमानाची ओलांडली सरासरीजवळपास प्रत्येक महिन्यासाठी हवामान खात्याने निश्चित केलेल्या तापमानाने सरासरी पातळी केव्हाचीच ओलांडलेली दिसून येते. फेब्रुवारी २०१८ मध्ये रत्नागिरीचे तापमान हे ३५.४ अंश सेल्सिअस एवढे होते. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ५.६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तापमान कायमस्वरुपी बदलत आहे. प्रत्येक ऋतू हा त्याची सरासरी ओलांडत असल्याचे दिसून हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसून येते.मुंबई-रत्नागिरीचे समान तापमानमुंबई आणि उकाडा हे समीकरण अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात रत्नागिरीनेही तापमानाच्या बाबतीत मुंबई गाठली आहे. फेब्रुवारी २०१८ चा अपवाद वगळता गेल्या वर्षभरात रत्नागिरी आणि मुंबईचे तापमान हे जवळपास एकच होते. त्यामुळे रत्नागिरीतील वाढत्या तापमानाची कल्पना येईल. फेब्रुवारीत मुंबईचे सरासरी तापमान हे ३७.४ तर रत्नागिरीचे सरासरी तापमान हे ३५.४ एवढे होते.अर्धा हंगाम संपूनही काजूची प्रतीक्षाचयंदा वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. डिसेंबरच्या काळात थंडी आणि त्यानंतर अचानक वाढलेले तापमान यामुळे यंदा काजूचा अर्धाअधिक हंगाम संपून गेला तरी बागायतदारांना काजूची प्रतीक्षाच आहे. दहा वर्षांपूर्वी काजूचे उत्पन्न हे शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट ठरवत होते. आता हे पीकही हातचे जाऊ लागले आहे.त्सुनामीनंतर बारमाही पाऊस झाला स्थायिक२००४ पूर्वी ऋतुमान हे परंपरेनुसारच चालू होते. मात्र, २००४ मध्ये आधी भूकंप आणि नंतर त्सुनामी आल्यानंतर हे ऋतुचक्र बदलले आहे. २००४ मध्ये त्सुनामी आली तीही डिसेंबर महिन्यात. या त्सुनामीबरोबरच पाऊसही आला. खरंतर आॅक्टोबरमध्येच पाऊस रजा घेतो. मात्र, डिसेंबरमध्ये त्सुनामीबरोबरच मुसळधार पावसाने दर्शन दिले आणि त्यानंतर रत्नागिरीत पाऊस बाराही महिने स्थायिक झाला. २०१७ मध्ये वर्षातून १७ ते २० वेळा अवकाळी पाऊस पडला. यावरून ऋतुचक्राचे बदलते स्वरुप लक्षात येते.त्सुनामीचे परिणामजपानच्या डब्ल्यूडब्ल्यूएफ या संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, २००४ साली त्सुनामी आल्यानंतर जागतिक हवामानात मोठा बदल झाला आहे. त्सुनामीचा सर्वाधिक तडाखा ज्या जपानला बसला, त्याठिकाणचे तापमान २००५ नंतर झपाट्याने वाढत आहे आणि जपानमध्ये तापमान ही एक मोठी समस्या बनली आहे. भारतातील सागरी किनारपट्टीत वाढलेल्या तापमानालाही त्सुनामी कारणीभूत असल्याचे या संस्थेने अभ्यासाअंती म्हटले आहे.फळं, मोहोर गळण्याची भीती : हवामान खातेवाढत्या तापमानाचा मोठा परिणाम रत्नागिरीतील हापूसवर होणार असून, हवामान खात्याने वाढत्या तापमानामुळे मोहोर आणि फळं गळण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कीटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.किमान तापमानापेक्षा कमाल वाढले...गेल्या काही वर्षात बदललेले रत्नागिरीतील हवामान आता येथील लोकजीवनाला मारक ठरत आहे. रत्नागिरीच्या हवामानाचा अंदाज घेतला असता, किमान तापमानापेक्षा कमाल तापमान वाढल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.सणांनीही सोडली ऋतुमानाची साथबरेचसे सण हे नक्षत्र, तिथी यावर आधारित असतात. त्यामुळे पूर्वी दसरा झाला की पावसाळा संपला असे म्हटले जायचे. मकरसंक्रात झाली की हळूहळू तापमान वाढते, असे म्हटले जायचे. मात्र, आता कोणत्याही महिन्यात कोणत्याही ऋतूचे दर्शन होते. दसऱ्यानंतरच नव्हे तर वर्षभरात केव्हाही पाऊस पडू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल, राजापूर, लांजाचा काही भाग आदी ठिकाणी तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला.हापूसबाबतीत भयंकर सत्यदापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातील पी. एस. अभिषेक याने हापूसवर बदलत्या वातावरणाचा होणारा परिणाम यावर डॉ. पी. ए. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मे २०१७ मध्ये अभ्यास केला. हा अभ्यास करण्यासाठी त्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील मिळून १६ गावांमधील १२८ प्रथितयश आंबा बागायतदारांशी चर्चा केली. त्यातून हापूसचे भयंकर सत्य समोर आले आहे.
२००५ नंतर वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे हापूसच्या फळाची गळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हापूसचे वेळापत्रकच बदलून गेले आहे. हापूस परिपक्व होण्यापूर्वीच त्याची गळ होत आहे. तसेच कीटक तसेच विविध रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याचे या अभ्यासाअंती अभिषेक याने म्हटले आहे. हापूसवर होणारा खर्च हा कित्येक पटीने वाढला असून, तो परवडण्यापलिकडे गेल्याचे या अभ्यासाअंती स्पष्ट होतआहे.