रत्नागिरी : पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे.यावर्षी मान्सूनला सुरूवात होण्याआधीच मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात सुरू होता. यावर्षी मान्सूनच्या पावसानेही हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात वेळेवर हजेरी लावली. पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी थोड्या दिवसानी विश्रांती घेईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, तोही यावर्षीच्या पावसाने फोल ठरवला.अगदी सात जूनपासून नियमित झालेला पाऊस मध्यंतराच्या काळामध्ये अगदी थोड्याशा विश्रांतीने पुन्हा सुरू झाला आहे. जिल्ह्यात २१ जूनपासून पावसाने न थांबता हजेरी लावली आहे. संततधार सुरू असल्याने शेतीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात तर लावणीलाही वेग आला आहे.पावसामुळे जिल्ह्यातील घरे, गोठे यांच्या पडझडीलाही प्रारंभ झाला आहे. गेल्या जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत ८८८.४४ मिलिमीटर पाऊस पडला होता, तर यावर्षी ३० जूनअखेर १२५५.७२ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. म्हणजेच तब्बल ३६७.२८ मिलिमीटर अधिक पाऊस यावर्षी झाला आहे.
पावसाची वाटचाल अशीच सुरू आहे. त्यामुळे आता एकूण पाऊस १४८९ मिलिमीटर इतका झाला आहे. गतवर्षी या कालावधीत १०१७.२९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाची आगेकूच सुरू असून, आतापर्यंत ४७१ मिलिमीटर सरासरीने पाऊस अधिक झाला आहे. मात्र, या काळात जिल्ह्यात कुठे पाणी भरण्याच्या घटना घडल्या नाहीत.सध्याही पावसाचा जोर काही दिवस तरी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, संततधार पावसामुळे गारवा आला आहे. दरम्यान, पावसाची सुरूवात तसेच एकंदरीत वाटचाल चांगली सुरू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.