राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरुन विरोधाची लाट निर्माण झाली असतानाच अद्यापपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणतीच भूमिका जाहीर न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजवर विकासालाच प्राधान्य देणारे मनसे अध्यक्ष यावेळी रिफायनरीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रकल्प परिसराचा दौरा करणार आहेत. यावेळी प्रखर विरोध करणाऱ्या जनतेशी संवाद साधणार आहेत. केंद्र व राज्याची भागिदारी असलेला रिफायनरी प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्यात आला आहे. त्याला स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे.
ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, दोन्ही काँग्रेससह नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या प्रकल्पाबाबत मनसेने अद्याप आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी सागवे - नाणार परिसराचा दौरा केला होता.
या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाला नक्की विरोध कशासाठी आहे, याची माहिती घेतली होती. मनसेने विकासाला प्राधान्य दिले असले एखादा प्रकल्प शासन लादत असेल तर त्याला विरोध असेल असे मनसेच्या नेत्याने त्यावेळी सांगितले होते.या प्रकल्पाबाबत काही ग्रामस्थांनी राज ठाकरे यांच्याशी मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. या चर्चेदरम्याने त्यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेत आपण प्रकल्प परिसराचा दौरा करूनच याबाबत आपली भूमिका मांडू असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी ते नाणार परिसराला भेट देणार आहेत. यावेळी ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष लागले आहे.