रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व विभागांना दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. शिवाय वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा आढावाही घेण्यात येत असतो. कोकण परिमंडलाने यावर्षी विक्रमी वसुली करीत महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक भांडूप परिमंडलने पटकावला आहे.महावितरण कंपनीतर्फे सर्व पातळ्यांवर कामकाजाचा आढावा घेतला जात असताना केवळ वसुलीमध्येच नाही तर परिमंडलात असलेल्या वीज हानीचा आढावा, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, वीज जोडण्यांची परिस्थिती, फिडरनिहाय भारनियमन आदी निकषांवर गुणांक दिले जातात. दि. १ एप्रिल ते दि. ३१ मार्चअखेर कोकण परिमंडलाने ९९.६४ टक्के विक्रमी वसुली करून राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे.राज्यातील १६ परिमंडलांतर्गत यावर्षी भांडूप परिमंडलाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. भांडुप परिमंडलाची वीज वसुली ९९.८२ टक्के इतकी आहे. पुणे विभागाने ९८.६० टक्के वसुली करीत तृतीय क्रमांक कायम राखला आहे. कोकण प्रदेशचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांनी या यशाबद्दल मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर, सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
कोकणातील जनतेत वक्तशीरपणामहावितरणच्या यशात सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण त्याशिवाय कोकणातील जनता शासकीय देणी वक्तशीरपणे भरतात. यामुळेच हे शक्य झाले. सर्व कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व तांत्रिक कर्मचारी तसेच आस्था विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी मेहनत घेतल्यामुळेच विक्रमी वसुली करण्यात यश आले.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.