रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे दिली.
कोकण रेल्वेसाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेच्या नोकरीत प्राधान्य देण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वेने सुरुवातीलाच स्वीकारला आहे. आतापर्यंत २८०३ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले असून, हे प्रमाण ५१ टक्के आहे.
कोकण रेल्वेच्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले जात नाही, असा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा आक्षेप आहे. त्या वस्तूस्थितीबाबत तेलंग बोलत होते.
२ वर्षांपूर्वी कोकण रेल्वेने लोकोपायलटच्या ४९ पदांकरिता प्रकल्पग्रस्तांसाठीच भरती प्रक्रिया राबवली. मात्र, त्यावेळी १३ उमेदवारच मिळाले. अन्य जागा रिक्त राहिल्या. या पदासाठी सक्षम उमेदवार लागतात. त्यामुळेच शेवटी खुल्या गटातून ही पदे भरण्यासाठी जाहिरात द्यावी लागली, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त (लॅण्ड लुझर) हा १०० टक्के जमीन गेलेला असावा, अशी अट सुरुवातीला होती. मात्र, त्यानंतर ही अट ७०, ५०, ३० टक्के अशी शिथिल होत गेली. आतातर १ टक्का जमीन रेल्वेसाठी दिलेल्यांनाही प्रकल्पग्रस्त म्हणून कोकण रेल्वेत नोकरी मिळू शकते.
प्रकल्पग्रस्ताची व्याख्याही करण्यात आली आहे. त्यानुसार कुटुंबप्रमुख स्वत:, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, अविवाहीत मुलगी, नातू किवा अविवाहीत नात या व्याख्येत येतात.
नातेवाईकांच्या नाहरकत प्रमाणपत्राची याआधीची अटही २०१२मध्ये रद्द करण्यात आली. कोकण रेल्वेतील नोकर भरतीबाबतची सर्व माहिती यावेळी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे प्रसारमाध्यमांना देण्यात आली. यावेळी रत्नागिरी क्षेत्रीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये व अन्य अधिकारी उपस्थित होते.अॅनालायझेशन चाचणीत अपात्रकोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त बेसिक परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र, त्यातील बहुतांश उमेदवार सायको अॅनालायझेशन चाचणीत अपात्र ठरतात. सुरक्षिततेसाठी चाचणी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे.
रेल्वेत आतापर्यंत ६२ वेळा नोकरभरती करण्यात आली. त्यातील प्रत्येकवेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. फक्त २०१७ मधील भरती ही केवळ ठराविक श्रेणीत मागासवर्गीयांसाठी होती. या श्रेणीतील उमेदवार प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे ते म्हणाले.गुणवत्ता यादी वेबवर शक्यकोकण रेल्वेने माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती ४ महिन्यांपासून दिलेली नाही. नोकर भरतीसाठी परीक्षा घेतल्या तर त्यातील गुणवत्ता यादी व उर्वरित उमेदवारांना मिळालेले गुण सांगितले जात नाहीत. त्यामुळे सारा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.
नोकरभरतीत पारदर्शकता येण्यासाठी भरतीप्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी जाहीर का केली जात नाही, असे विचारता ही मागणी रास्त आहे. तसे करता येऊ शकेल. मात्र, हा निर्णय मी घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.