राजापूर : नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्याचे दर्शन घडू लागले लागले आहे. यापूर्वी होळी, गुढी पाडवा, आषाढी एकादशी, दहीकाला या उत्सवांनंतर आता पार पडत असलेल्या गणपती उत्सवादरम्यान रिफायनरीविरोधात ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले आहेत.मागील काही महिने नाणारमधील रिफायनरी प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. स्थानिक पातळीपासून ते मंबई, दिल्लीपर्यंत हादरे देण्याचे काम या प्रकल्पाविरुध्द आंदोलनांमधून सुरू आहे. प्रकल्प परिसरातील चौदा गावांतील जनतेची तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्पच रद्द करा, अशी जोरदार मागणी सुरू आहे.
पण शासन मात्र हा प्रकल्प रेटून नेण्याच्या तयारीत असल्याने सुरु असलेला संघर्ष अधिकच पेटत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष विरहित ही आंदोलन करून प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवून दिली आहे.केंद्र्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवगळता उर्वरित राजकीय पक्ष रिफायनरीविरोधात उभे ठाकले आहेत. तरीही शासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संतप्त जनतेने आपला लढा व्यापक बनविला असून, मागील काही महिने कोकणात साजऱ्यां झालेल्या काही सणांदरम्यान नाणार विरोधाचे दर्शन घडले होते.यापूर्वी होळी सणादरम्यान रिफायनरी प्रकल्पाची होळी पेटवताना शासनाचा निषेध म्हणून बोंबा मारण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर रिफायनरीविरोधात काळ्या गुढ्या उभारुन विरोध व्यक्त करण्यात आला होता. आषाढी एकादशीच्या दिवसात सागवे परिसरात, तर मुंबईत प्रकल्पविरोधात दिंड्या काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी सणाच्या दिवशी प्रकल्पाविरोधी नारा देण्यात आला होता.गणपती उत्सवात रिफायनरीला विरोध करणारे देखावे ठिकठिकाणी बनविण्यात आले आहेत. यामध्ये प्रकल्पाची घातकता, पूर्वीचे कोकण व रिफायनरी प्रकल्प मार्गी लागल्यानंतरचे कोकण याची तुलना करणारे वास्तव दाखविले गेले आहे. रिफायनरीविरोधी देखाव्यांसह बॅनरबाजी व रांगोळीतून प्रखर विरोधाचे दर्शन घडविले गेले आहे. सागवेतील भूमिकन्या एकता मंचाच्या वतीने प्रकल्पविरोधातील जनजागृती करणारी काढण्यात आलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.विघ्नांचे हरण करणाऱ्या गणराया, आता तूच आमच्या कोकणावर आलेले हे विघ्न तत्काळ दूर कर व निसर्गरम्य कोकण वाचवह्ण, अशी आर्त साद घालणारे बॅनरही लक्षवेधी ठरले आहेत.