रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे करून यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी विभागाचा समावेश असून, रत्नागिरी विभागाला तसे परिपत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विभाग नियंत्रक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी वाढवा अभियान राबवून विभागाचे उत्पन्न वाढविण्यात यश मिळविले आहे. पूर्वी विभागाचे प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु यावर्षी उत्पन्न ६५ लाख इतके झाले आहे.विभागात ७९० गाड्या असून, दररोज ४५०० इतक्या फेऱ्या आहेत. दररोज २ लाख १६ हजार किलोमीटर इतका प्रवास होतो. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच ऊन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.कर्मचाऱ्यांमधील मरगळ झटकत असताना कामचुकार कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली सुरूवातीच्या काळात केली. मात्र, कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता विभाग नियंत्रक देशमुख यांनी घेतल्याने उत्पन्नात वाढ झाली. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात आल्या आहेत. आता ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे.प्रवासी वाहतूकीदरम्यान इंधन, वंगण बचतीबरोबर चालक, वाहकांचा ओव्हरटाईम कमी असणाऱ्या विभागांना ‘अ’ श्रेणी दर्जा दिला जातो. रत्नागिरी विभागाने या निकषांचे पालन केल्यानेच ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. (प्रतिनिधी)राज्यातील ३१ एस. टी. विभागांचा महामंडळाकडून नव्याने सर्वे.यावर्षी १८ विभागाना ‘अ’ श्रेणी.रत्नागिरी विभाग नेहमी ‘क’ व ‘ब’ श्रेणी मध्ये असताना यावर्षी ‘अ’ श्रेणी प्राप्त.विभागाचे प्रतिदिन उत्पन्न ५० लाखांवरून ६५ लाखांवर.
रत्नागिरी विभागाला ‘अ’ श्रेणी
By admin | Published: November 23, 2014 10:42 PM