दापोली : मे महिन्याच्या सुरूवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे यावर्षी वीस टक्केच हापूसचे उत्पादन आले. त्यामुळे बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या दरावरही परिणाम झाला होता. यावर्षी कॅनिंग व्यवसायाला देखील फटका बसला असून, कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. सध्या प्रतिदिन एक ते दीड हजार टन आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे.ओखी वादळासह बदलत्या वातावरणामुळे यावर्षी पिकावर परिणाम झाला. आंबापीक दरवर्षी बदलत्या हवामानाच्या गर्तेत सापडते. यावर्षी हंगाम लांबणार याचे संकेत आधीच मिळाले होते. आवक कमी असल्याने वाशीसह मोठ्या बाजारात डझनाचा दर चढा होता. मात्र, एप्रिलच्या अखेरीस दर खाली आले. त्यातच मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांनी आपल्या बागेतील आंबे काढून कॅनिंगला देणे पसंत केले.
त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कॅनिंग सुरू झाले. सध्या कॅनिंगला आंबा देण्याकडेच बागायतदारांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. सध्या प्रतिकिलोचा दर १८ ते २० रुपयांवर स्थिर आहे. हा दर वाढणे गरजेचे असल्याचे बागायतदारांनी सांगितले.कॅनिंगसाठी देण्यात येणाऱ्या आंब्याचा दर्जा चांगला नसल्याने कॅनिंगवाल्यांकडून कमी दर देण्यात येत आहे. उत्पादन कमी असतानाही दर कमी राहिल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा आली. उत्पादन कमी असल्याने बागायतदारांना हंगामाच्या अखेरीस नफा वाढण्याची शक्यता होती.