रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता शासकीय कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करावा. शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने टीम म्हणू काम केले पाहिजे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिल्या.रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, जिल्हाधिकारी सभागृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जैन म्हणाले, आपल्या राज्याच्या एकूण बजेटचा विचार करता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त खर्च होत आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त शासकीय काम कशी करता येतील ते पहा.
यासाठी कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करा. यावेळी जिल्ह्यातील रिक्त पदांचाही आढावा त्यांनी घेतला. ते म्हणाले, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रामध्ये जेथे आपल्या पुढील पिढीचं भवितव्य अवलंबून आहे, त्या खात्यामध्ये रिक्त पदे भरणे गरजेच आहे आणि ती भरण्यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. सातबारा संगणकीकरण, महसूल रेकार्ड स्कॅनिंग, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या २४ तास कार्यरत असलेल्या मदत कक्ष उपक्रम, शासकीय वसुली, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, रत्नागिरी - मिऱ्या- नागपूर महामार्ग चौपदरीकरण, जयगड - डिंगणी रेल्वे प्रकल्प आदीबाबतही त्यांनी माहिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालय येथे येण्यापूर्वी दिनेशकुमार जैन यांनी मजगाव रोड विमानतळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपविभागीय अधिकारी अमित शेडगे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या कार्यालयाच्या भेट देऊन चर्चा केली. तटरक्षक दलाचे कमांडिंग आॅफिसर एस. आर. पाटील यांनी त्यांना माहिती दिली.