रत्नागिरी : ते दोरीच्या सहाय्याने ६० फूट विहिरीत उतरले. बुडून बेशुद्ध पडलेल्या दोन वर्षांच्या बाळाला त्यांनी जवळ घेतले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी उलटे करून छातीवर दाब दिला व बाळाच्या पोटातील पाणी काढले. त्यातून बाळ शुद्धीवर आले. त्यानंतर लोकांच्या मदतीने विहिरीबाहेर काढले. ही घटना आहे खेडशी येथील. बाळाचे नाव यश दत्ता होळकर व ज्यांनी वाचवले त्यांचे नाव मोहन हरिश्चंद्र झिरवाल असे आहे.राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या रत्नागिरी येथील टीआरपीमधील यांत्रिक विद्युत मोहन हरिचंद्र झिरवाल लक्ष्मी मंदिर खेडशीला चालले होते. सायंकाळचे ४.३० झाले होते. त्यावेळी मित्राच्या घराजवळून ओरडल्याचा, रडल्याचा आवाज ऐकू आला. मित्राला वाटले हा आवाज टी. व्ही.चा असले. तेवढ्यात एक महिला ओरडल्याचा आवाज आला.
तिचे दोन वर्षांचे बाळ विहिरीत पडले होते. वाचवा, वाचवा असे ती ओरडत होती. त्यावेळी झिरवाल विहिरीकडे धावले. पाहतात तो बाळ उताणे निपचीत पडले होते. काय करावे कळेना. त्यावेळी विहिरीच्या पंपाला बांधलेल्या दोरीकडे त्यांचे लक्ष गेले.
तातडीने कपडे बाजूला फेकले व त्या दोराला धरून विहिरीत उतरले. बाळाला खांद्यावर घेतले. बाळ बेशुद्ध होते, त्याच्या पोटात पाणी गेले होते. त्यामुळे दोरी धरून वर येणे शक्य नव्हते. काठावर बघ्यांची गर्दी झाली होती. त्यांना दोराच्या सहाय्याने वर ओढण्यास सांगितले. वरती आल्यावर बाळाला त्याच्या आईने मिठी मारली. तो क्षण झिरवाल आयुष्यात कधीही विसरणार नाहीत.