रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे शिक्षण तसेच अनुभवाच्या जोरावर नियमित शासकीय सेवेमध्ये समायोजन करावे, या मागणीसाठी मंगळवारपासून अधिकारी व कर्मचारी महासंघाने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मेपर्यंत चालणार आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे ही मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. यापूर्वीही संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. ११ ते २१ एप्रिल या दरम्यान हे काम बंद आंदोलन झाले.यावेळी आरोग्यमंत्र्यांनी पुढील दहा दिवसात त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल, असे सांगून त्यांची सभा घेऊन अधिकारी व कर्मचाºयांच्या समायोजनाच्या दृष्टीने पुढील पदभरती थांबविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले. मात्र, दहा दिवसांची मुदत टळल्यानंतरही शासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने ८ मेपासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन १४ मेपर्यंत चालणार आहे.