रत्नागिरी : शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत दररोज ४७ मिळून एकूण २७२६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांबरोबर आजपासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सुरू झाल्या आहेत.
रत्नागिरी विभागातून दररोज १५० गाड्या मुंबई मार्गावर धावत असतात. त्याशिवाय दररोज ४७ जादा गाड्या आजपासून धावणार आहेत. फक्त निवडणूक कालावधीत तीन दिवस जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन दिवसात १४१ जादा गाड्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दापोली आगारातून ठाणे, बोरिवली, मुंबई, विठ्ठलवाडी, भार्इंदर मार्गावर एकूण पाच जादा गाड्या दररोज सुटणार आहेत. खेड आगारातून आठ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. भांडूप, मुंबई, तुळशी-बोरिवली, ठाणे, स्वारगेट या मार्गावर गाड्या धावणार आहेत. चिपळूण आगारातून बोरिवली, कोल्हापूर, परळी, चिंचवड मार्गावर चार जादा गाड्या सुटत आहेत. गुहागर आगारातून जत, ठाणे, बोरिवली, विरार, मुंबई मार्गावर सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरूख आगारातून स्वारगेट, बोरिवली, कल्याण मार्गावर तीन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
रत्नागिरी आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जयगड-बोरिवली, रत्नागिरी - बोरिवली, रत्नागिरी - मुंबई मार्गावर सात जादा गाड्या धावणार आहेत. लांजा आगारातून बोरिवली व मुंबई मार्गावर दोन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. राजापूर आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, पुणे मार्गावर चार जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मंडणगड आगारातून सात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विरसई - बोरिवली, केळशी -नालासोपारा, दाभट - बोरिवली, मंडणगड - मुंबई जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा गाड्यांचे आॅनलाईन आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाच्या मागणीनुसार दि. २१ ते २३ एप्रिलअखेर तीन दिवस जादा गाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबई मार्गावरील सर्व जादा गाड्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय दिवटे यांनी दिली.
दोन महिने एस. टी.चे
लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारा उन्हाळी हंगाम त्यामुळे एस. टी. महामंडळाला चांगलाच फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचारी, अधिकारी, मतपेट्या सामानांची वाहतूक करण्यासाठी ४१३ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातील गाड्यांचेही नियोजन करण्यात आले असून, या दोन्ही महिन्यात एस. टी. महामंडळाच्या गाड्या बिझी राहणार आहेत.