रत्नागिरी : शहर बाजारपेठेतील रामआळी येथे एका दुकानात कपडे खरेदी करीत असताना एका व्यक्तीच्या खिशातील १० हजार रुपये एका अल्पवयीन मुलाने लंपास केले तर त्यानंतर खारेघाट रोड येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या याच व्यक्तीचे पाकीट लांबवून अज्ञात तरुणाने ६ हजार रुपयांसह महत्वाची कागदपत्रेही लंपास केली.
याप्रकरणी राजेंद्र महादेव देसाई (५४, रा.सडामिऱ्या, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ३.३० ते ४.०० वाजता या अर्ध्या तासात हा प्रकार घडला.याबाबत राजेंद्र देसाई यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामआळी येथील कॉर्नर स्टाईल या दुकानात कपडे खरेदीसाठी गेल्यानंतर तेथे एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या खिशातील १० हजार रुपये लंपास केले.
त्यानंतर खारेघाट रोड येथील एका एटीएममध्ये गेल्यानंतर एका तरुणाने त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. त्यामध्ये ६ हजार रुपये होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दिवाळी सण असल्याने चोरटे गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करीत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.