रत्नागिरी : दीड कोटी खर्च करून रत्नागिरी पालिकेतर्फे उमेश शेट्ये यांच्या प्रयत्नातून त्यांच्याच प्रभागात उभारलेल्या दीड कोटींच्या बाबुराव संसारे उद्यान उदघाटनावरून पालिकेत गेल्या चार दिवसांपासून वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे १६ जून २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या उद्यानाच्या उदघाटनाला नगराध्यक्ष महेंद्र मयेकर उपस्थित राहणार की नाहीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांना राजकीय वादंगात स्वारस्य नसून संसारे उद्यानाच्या निमित्ताने चांगले उद्यान लाभल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात थिबा पॉइंट येथील पालिकेचे जिजामाता उद्यान लोकप्रिय आहे. मांडवी बंदर व जेटी परिसरही पर्यटनदृष्टया विकासाच्या प्रतिक्षेत आहे. शहरातील ३६ उद्यानांपैकी जिजामाता, भगवती किल्ला, विश्वनगर ही उद्याने चांगल्या प्रकारे विकसित झाली आहेत. आता मारुतीमंदिर एकतानगर येथे पालिकेने उभारलेल्या बाबुराव संसारे उद्यानाची त्यात भर पडली आहे. मात्र या उद्यानाच्या उदघाटन समारंभावरून गेल्या चार दिवसांपासून वादंग सुरू झाला. नगराध्यक्ष मयेकर यांना या उद्यानाचे उदघाटन दिवाळीत करावयाचे होते. परंतु काम पूर्ण झाल्याने नगरसेवक उमेश शेट्ये यांनी तत्काळ उदघाटनाचा आग्रह धरल्याने हा राजकीय वाद निर्माण झाला. (प्रतिनिधी)
सुसज्ज उद्यानामुळे रत्नागिरीकर समाधानी
By admin | Published: June 16, 2015 1:16 AM