रत्नागिरी : राज्य शासनाने पतंजली विद्यापीठाला मान्यता दिली असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात पाच हजार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीच्या शाळा चालण्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन पतंजली विद्यापीठासाठी शालेय शिक्षण विभागात चुकीचे निर्णय राबवत आहे का? राज्यातील शाळा बंद पाडण्याचा हा डाव तर नाही ना? असे अस्वस्थ करणारे प्रश्न महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी उपस्थित केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हा वार्षिक अधिवेशनामध्ये बोलत होते.दलवाई हायस्कूल, मिरजोळी (ता. चिपळूण) याठिकाणी आयोजित या जिल्हा अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भारत घुले होते. मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष खालिद दलवाई यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष रामचंद्र महाडिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी टीडीएफचे ज्येष्ठ नेते सदाशिव चावरे, कोकण विभागाचे कार्यवाह अशोक आलमान, सहकार्यवाह लक्ष्मण पावसकर, जिल्हा कार्यवाह सागर पाटील, सर्व तालुकाध्यक्ष व सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पतपेढीचे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते. यावेळी चिपळूण तालुक्यातील पदोन्नतीप्राप्त व विशेष गौरवप्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह सागर पाटील यांनी केले.मनोगतात ज्ञानेश्वर कानडे यांनी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधी पक्षात असताना शिक्षक संघटनांच्या मागण्या योग्य आहेत, सरकारने त्या मान्य करायलाच हव्यात. सरकार शिक्षण क्षेत्रावर अन्याय करत आहे, अशी ओरड करणारेच आता सत्तेत आल्यावर शिक्षण क्षेत्रावर अनेक अन्यायकारक निर्णय लादत आहेत, असे कानडे यांनी सांगितले.यावेळी सदाशिव चावरे, अशोक आलमान, लक्ष्मण पावसकर, संभाजी देवकाते, रामचंद्र महाडिक व पुरस्कर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. भारत घुले यांनी अध्यापक संघ शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. अधिवेशनानंतर कार्यकारी मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिपळूण तालुकाध्यक्ष रोहित जाधव, रमेश यादव यांनी केले.