रत्नागिरी : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, गुरूवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती.जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून, बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे़ मुसळधार पावसाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्रानेही रौद्ररूप धारण केले आहे.
सकाळपासूनच समुद्र खवळलेला आहे. दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. दुपारनंतर साडेतीन मीटरउंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मान्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उधाण असणार आहे. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आठ दिवसांचे लॉकडाऊन गुरूवारी संपल्यानंतर बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली होती़ मात्र, दोन दिवस अतिवृष्टीमुळे संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने गुरूवारी पाऊस असूनही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांचीही गर्दी झाली होती़ बाजारपेठेतील दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या़