रत्नागिरी : शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून विश्रांती घेणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंतीदिनी चिपळूण निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.भास्कर जाधव हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते. काही कारणाने त्यांनी सेनेला ह्यजय महाराष्ट्र करीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या हुशारीचा, आक्रमकतेचा राष्ट्रवादीने अत्यंत चांगल्या प्रकारे पक्षासाठी उपयोग केला. जाधव यांना राष्ट्रवादीने कॉँग्रेस आघाडीच्या सत्तेत कॅबिनेट मंत्रीपद दिले. त्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद दिले.या पदांना जाधव यांनी चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले. त्याबाबत निर्णय घ्यायला भाग पाडले. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर गुहागरमधून निवडणूक लढवित सेनेचे नेते, सध्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना त्यावेळी त्यांनी पराभूत केले होते.आमदार जाधव यांनी आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा राज्यभरात उमटवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पायावर शस्त्रक्रिया झाली असून, सध्या ते चिपळूण येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणाही होत आहे.आजारी असल्याने आमदार जाधव यांची विचारपूस करण्यासाठी अनेकजण त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. मात्र, शिवसेनेने त्यांच्या आजारपणाबाबत विचारपूस करताना खूपच आत्मियता दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आमदार जाधव राष्ट्रवादीत असले तरी शिवसेनेतील नेत्यांशी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांची मैत्री ही अतूट असल्याचेही यानिमित्ताने समोर आले. जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्येच गेल्या दशकभरात सातत्याने जोरदार राजकीय युध्द रंगले आहे. यामध्ये आक्रमकतेने सेनेच्याविरोधात तोफ डागणा मध्ये आमदार जाधव हे सर्वांत पुढे होते.जाधव यांच्यामुळे लोकसभेत फायदागेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दापोली व गुहागर या दोन्ही जागांवर सेनेचा पराभव करून राष्ट्रवादीला विजय मिळवून देण्यातही जाधव यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे भास्कर जाधव यांना सार्वत्रिक निवडणुकांआधी पुन्हा स्वगृही शिवसेनेत आणावे, असा प्रयत्न सेनेच्या नेत्यांकडून सातत्याने सुरू आहे. आपण राष्ट्रवादीतच आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न आमदार जाधव यांच्याकडून सातत्याने होत आहे. मात्र, त्यांच्या आजारपणाच्या निमित्ताने विचारपूस करताना सेना नेत्यांचे प्रेम ओसंडून वाहात होते. जाधव यांच्यामुळे सिंधुदुर्गात लोकसभा निवडणुकीत कसा फायदा मिळाला, हे सांगण्यासही खासदार राऊत विसरले नाहीत. ही स्थिती पाहता सेना नेत्यांप्रमाणेच आमदार जाधवही सेनेच्या प्रेमात पडणार का, हे येणारा काळ ठरविणार आहे.
रत्नागिरी : शिवसेना पुन्हा भास्कर जाधव यांच्या प्रेमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 4:15 PM
शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
ठळक मुद्दे शिवसेना पुन्हा भास्कर जाधव यांच्या प्रेमात, आस्थेने केली विचारपूस पायावरील शस्त्रक्रियेनंतर विनायक राऊत, सदानंद चव्हाण भेटीला