रत्नागिरी/चिपळूण : लकी ड्रॉमध्ये चारचाकी गाडी लागल्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका महिलेला पावणेदोन लाख रूपयांना तसेच चिपळुणातील एका तरूणाला सात हजार रूपयांना गंडा घालण्यात आला. दूरध्वनीवरून चारचाकी गाडीचे आमिष दाखवून पैसे लुटण्याच्या घटना वाढू लागल्या असून, रत्नागिरी शहर तसेच चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
दुर्वा गणेश पालकर (२८, प्रतीक अपार्टमेट जुगाईमंदिर झाडगाव, रत्नागिरी) यांची यात फसवणूक झाली असून, त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने संपर्क साधला आणि ‘तुम्हाला लकी ड्रॉमध्ये इंडीका कार लागली आहे. तुम्हाला गाडी नको असेल तर ६ हजार ८०० रुपये भरल्यानंतर गाडीचे सात लाख रुपये देऊ. जर गाडी हवी असेल तर वॅट व टीडीएस फाईल करणे व आरबीएल कोडसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील’, असे सांगण्यात आले. मनी शंकर, प्रिन्स शर्मा, अयोध्या कुमार व राहुल शर्मा याच्या मोबाईलवरून दुर्वा पालकर यांच्याशी संबंधितांनी संपर्क साधला होता.
आपल्याला कार लागली असल्याचे कळल्यानंतर खुश झालेल्या दुर्वा यांनी त्यांना सांगण्यात आलेल्या खात्यावर १ लाख ७५ हजार रुपये भरले. मात्र पैसे भरूनही त्यांना कार मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आठवड्यातील दुसरी घटनाआठवडाभरापूर्वी रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरात अशाच पध्दतीने सफारी कार लागल्याचे सांगून प्रौढाची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता लगेच त्या परिसरातच घडलेली ही दुसरी घटना आहे. वारंवार जनजागृती होऊनही नागरिक अजूनही अशा आमीषांना बळी पडत आहेत.चिपळुणात तरुणाची फसवणूकचिपळूणमधील बहादूरशेख नाका परिसरातील अविनाश दत्ताराम माने या तरुणाला अज्ञाताकडून भ्रमणध्वनी आला व आपल्याला १२ लाख ६० रुपयाची अलिशान गाडी लागली आहे. त्यासाठी प्रथम ७ हजार ५०० रुपये दिलेल्या क्रमांकावर भरा असे सांगण्यात आले. माने याने या आमिषाला बळी पडून एका राष्ट्रीयकृत बँकेत ७ हजार ५०० रुपये दिलेल्या खातेक्रमांकावर भरले असता दुपारी पुन्हा १८ हजार ९०० रुपये भरण्यास त्याला सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.