रत्नागिरी : पोपट काहीच खात नाहीये, पोपटाची चोच उघडीच आहे, पोपट काहीच हालचाल करत नाहीये. पण पोपट मेलाय असं म्हणायचं नाही, या अकबर बिरबलाच्या गोष्टीसारखीच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीची अवस्था झाली आहे. प्रचार सुरू आहे. सभा होत आहेत. वैयक्तिक गाठीभेटी होत आहेत. पण उमेदवार ठरलाय, हे जाहीर होत नाहीये. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता कायम आहे.महायुतीमधील शिंदेसेनेकडून पहिल्यापासून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी कधीही लपवले नाही. ते त्यांनी स्पष्टपणे मांडले. त्याचवेळी भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू झाली. भाजपने या मतदारसंघावर हक्क सांगितला. भाजपकडॅन वेगवेगळी नावे चर्चेत आली.जसजसे दिवस पुढे सरकत गेले तसा भाजप आणि शिंदेसेनेचा या जागेबाबतचा आग्रह वाढत गेला. मुंबईतील विशेषत: कल्याणच्या जागेवरुन जागावाटपाचे घोडे अडले होते. कल्याणची जागा शिंदेसेनेला देण्याची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपकडे जाणार, हे स्पष्ट झाले आहे.भाजपकडून खासदार नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला आहे. ते स्वत: जागोजागी जाऊन सभा, बैठका घेत आहेत. लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. त्यांचा स्वत:चा यातील सहभाग लक्षात घेता त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र या उमेदवारीची अधिकृत घोषणा मात्र महायुतीकडून अद्याप झालेली नाही. शिंदेसेनेकडून या मतदारसंघावरील दावा अजूनही कायम आहे. भाजपकडून प्रचार सुरू आहे. उमेदवारीची घोषणा आज होणार, उद्या होणार, असे अनेक मुहुर्त फुकटच गेले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची अस्वस्थता कायम आहे.
किरण सामंत मुंबईतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावल्यामुळे बुधवारी सायंकाळीच शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत मुंबईकडे रवाना झाले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झालेली नव्हती. या भेटीत नेमके काय होणार, याकडे महायुतीसह महाविकास आघाडीच्याही नजरा लागल्या आहेत.