रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचे मत उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे.
या दोन्ही जिल्ह्यांच्या २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार दोन्ही जिल्ह्यात महिलांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरी जिल्ह्याची एकूण संख्या १६ लाख १५ हजार इतकी नोंदविण्यात आली असून, त्यापैकी महिलांची संख्या ८ लाख ५४ हजार इतकी आहे. पुरूषांची संख्या ७ लाख ६१ हजार इतकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ८ लाख ५० हजार पैकी महिलांची संख्या ४ लाख ३२ हजार, तर पुरूषांची संख्या ४ लाख १७ हजार इतकी आहे.
१७व्या लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार महिलांची संख्या या दोन्ही मतदार संघात पुरूषांपेक्षा अधिक आहे. अंतिम यादीनुसार एकूण मतदारांची संख्या १४ लाख ५४ हजार ५२४ इतकी आहे, यापैकी महिला मतदार ७ लाख ४२ हजार, तर पुरूष मतदार ७ लाख १२ हजार इतके आहेत. त्यामुळे महिला मतदारांचे मत निर्णायक ठरणार आहे.
51% रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येच्या ५१ टक्के महिला मतदारांची संख्या आहे.
51% पुरवणी यादीसह तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतही महिला मतदारांची संख्या ७,४२,४७८ (५१ टक्के) इतकी आहे.
55% १ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत महिलांची संख्या ५१ टक्के होती. त्यांनतर मार्चअखेरपर्यंत नवमतदार नोंदणी झाली. यात १२,५८५ मतांनी वाढ झाली. यातही महिला मतदारांची संख्या ५५ टक्के आहे.
रत्नागिरीच्या एकूण लोकसंख्येच्या ५२.८३ टक्के महिलांची संख्या तर पुरूषांची संख्या ४७.१७ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या ५१ टक्के महिलांची संख्या तर पुरूषांची संख्या ४९ टक्के आहे.
अंतिम एकूण मतदार संख्या १४,५४,५२४ ; यात पुरूष ७,१२,०३४ (४९ टक्के) तर महिला मतदारांची संख्या ७,४२,४७८ (५१ टक्के) आहे.
१ जानेवारीनुसार अंतिम यादीनुसार एकूण मतदार १४,४१,९३६; यापैकी पुरूष ७,०६,३१८ (४९ टक्के) तर महिला मतदार ७,३५,६०९ (५१ टक्के)
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात नवमतदारांमध्ये १२,५८५ ने वाढ; त्यापैकी पुरूष ५७१६ (४५ टक्के) तर महिला मतदारांच्या संख्येत ६८६९ (५५ टक्के) ने वाढ झाली आहे. नवमतदारांच्या नोंदणीतही महिलांचीच नोंदणी अधिक आहे.