रत्नागिरी : कोकणासारख्या दुर्गम भागात ग्राहकांना अविरत वीजसेवा पुरविण्याची जबाबदारी नेटाने पार पाडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करीत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळाने वार्षिक वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करुन राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप दिली.रत्नागिरीस्थित कोकण परिमंडळ कार्यालयात उत्तम ग्राहकसेवा व महसूल वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीमुळे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, कार्यकारी अभियंता कैलास लवेकर (चिपळूण), विशाल शिवतारे (खेड), बाळासाहेब मोहिते (कणकवली), अजित अस्वले (चाचणी विभाग), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील, प्रणाली विश्लेषक हर्षद आपटे, व्यवस्थापक (वित्त व लेखा) रमेश पावसकर यांची उपस्थिती होती.महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभाग, उपविभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधीक गौरव करण्यात आला. मुख्य अभियंता भागवत यांचे आढावा बैठकीतील मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळाल्याने उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले, असे मत अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी व्यक्त केले. सर्व अभियंते, जनमित्र, लेखा कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांना यश मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरीत ५३५ काेटी वसूलरत्नागिरी मंडळाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ५३५ कोटी रुपयांची वीज बिलाची वसुली केली. त्यात चिपळूण विभागाने १३५ कोटी, रत्नागिरी विभागाने २५८ कोटी, खेड विभागाने १४१ कोटी रुपये वसूल केले. राजापूर उपविभाग क्र. १ व २, सावर्डा या उपविभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली.
सिंधुदुर्गात २८० काेटी वसूलसिंधुदुर्ग मंडळाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २८० कोटी रुपयांची वीज बिलाची वसुली केली. त्यात कणकवली विभागाने १३५ कोटी, कुडाळ विभागाने १४५ कोटी रुपये वसूल केले. देवगड, वैभववाडी व सावंतवाडी ग्रामीण या उपविभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली.