रत्नागिरी : ओखी वादळानंतर झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे वाटाण्याएवढ्या झालेल्या फळांची गळ झाली असून, मोहोरही कुजून गेला आहे. त्यामुळे झडलेल्या मोहोरातून पुन्हा मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे.
पालवी जून होऊन मोहोर येऊ लागला आहे. याशिवाय मोहोराच्या ठिकाणी पुन्हा पुनर्मोहोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारे आंबापीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. अतिथंडीमुळे या पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, पीक संरक्षणासाठी पुन्हा फवारणी करावी लागत असल्याने खर्च वाढला आहे.सन २०१४-१५मध्ये अवकाळी पावसामुळे आंबापीक धोक्यात आले होते. २०१५-१६मध्ये पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले तर २०१६-१७मध्ये अधिकतम पर्जन्यमान होऊनही नोव्हेंबरपासून चांगली थंडी सुरू झाल्याने मोहोर प्रक्रिया लवकर झाली. गतवर्षी चांगले आंबापीक आले होते. मात्र, परराज्यातील आंबा त्याचवेळी बाजारात आल्याने हापूसचे दर कोसळले. त्यावेळी शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ओखी वादळानंतर अवकाळी पावसामुळे मोहोर कुजला. वाटाण्याएवढी झालेली फळेही गळून पडली. कल्टार, वोल्टारसारखी संजीवके वापरलेल्या शेतकऱ्यांना या वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. यामुळे फुलोरा व त्याला आलेली फळे खराब झाली. त्यामुळे मोहोराचे तसेच फळांचे संरक्षणासाठी शेतकºयांनी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला.सध्या कमाल २७ तर किमान २० अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. अतिथंडीमुळे तुडतुड्यांचे प्रमाणही वाढले आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर पावसामुळे वाया गेला. आता दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा झाली आहे. मात्र, अतिथंडीमुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणेला धोका निर्माण झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील आंबा नैसर्गिक दृष्टचक्रातून वाचला, तर मार्चअखेर अथवा एप्रिलमध्ये तो बाजारात येण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तिसऱ्या टप्प्यातील मोहोर सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील झडून गेलेल्या मोहोराच्या देठातून मोहोर येऊ लागला आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात आंबा एकाचवेळी बाजारात येण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात एकाचवेळी आंबा बाजारात आला तर गतवर्षीप्रमाणे दर गडगडण्याचा धोका आहे. एकूणच आंबा पिकासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे आंब्याला चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळणार आहे.तुडतुड्याच्या विष्ठेलाच आंब्यावरील खार संबोधले जाते. आंब्यावरील काळ्या डागाचे (खार) प्रमाण अधिकतम असतानाच तुडतुड्यांचा त्रासही कायम आहे. किमान तापमानामुळे तुडतुड्यांचा प्रभाव वाढला असून, त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.
तुडतुडा पूर्णत: नष्ट होत नसल्यामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे. शेतकरी फवारणीसाठी महागडी कीटकनाशके वापरत आहेत. बागायतदारांनी सुरूवातीला दोन ते तीन टप्प्यात केलेल्या फवारणीचा खर्च वाया गेला आहे. अधिकतम थंडीमुळे एकाचवेळी सर्वत्र मोहोर प्रक्रिया सुरू होत आहे. परंतु, त्याला फळधारणा किती होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
संरक्षणासाठी फवारणीचा खर्च वाढलादरवर्षी निसर्गातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ओखी वादळामुळे पहिल्या टप्प्यातील हापूस आंब्याचा मोहोर कुजून गेला. तर दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला नुसताच फुलोरा होता, फळधारणेचे प्रमाणही कमी होते. गेल्या काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पुनर्मोहोरामुळे फळधारणेला धोका निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यातील कुजून गेलेल्या मोहोराच्या देठातून तिसऱ्या टप्प्यातील मोहोर सुरू झाला आहे. मात्र, तुडतुडाही वाढला आहे. मोहोर व फळाच्या संरक्षणासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे.- टी. एस. घवाळी,आंबा बागायतदार, रत्नागिरी.