अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत चर्चा सुरू असल्याने संप कधीही मिटण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणीच राहिल्याने रात्र तेथेच काढावी लागली. अनेकांनी आगाराबाहेर आंदोलन केल्याने रस्त्यावरच दिवाळी साजरी करावी लागली.
सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सव्वातीन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे बहुतांशी भागात जाणाऱ्या गाड्या जाऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यात दररोज १४९७ फेऱ्या सोडण्यात येतात. मात्र संपामुळे पहिल्या दिवशी केवळ १४ फेऱ्या सोडण्यात आल्या. पहाटेपासून कोणत्याच फेऱ्या सोडण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
या संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आगाराबाहेर निदर्शनेदेखील केली. या संपाबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यामुळे संप कधीही मिटून कामावर हजर व्हावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकजण कामाच्याच ठिकाणी उपस्थित होते.
संपाच्याच ठिकाणी कर्मचारी उपस्थित राहिल्याने दिवाळी रस्त्यावरच साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. बाहेर गावाहून आलेले कर्मचारी आपल्या घरी जाऊ न शकल्याने त्यांचीही दिवाळीत रस्त्यावरच रहावे लागले. अनेकांनी फराळही रस्त्यावर बसूनच केला.