रत्नागिरी : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु आहे. जो पर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन चालूच ठेवण्याची शपथ रत्नागिरीतील आंदोलक कर्मचार्यांनी घेतली आहे.
आज, सोमवारी सकाळी एसटी कर्मचार्यांनी विभागीय कार्यालय येथे कार्तिकी एकादशी निमित्त विठूरायाची पूजा व आरती करुन आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी विठूरायाला साकडं घातले. तसेच पांडुरंगाचा जयघोष केला. यावेळी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना सर्व कर्मचार्यांनी श्रध्दांजली वाहिली.
एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीची राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, संपाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या बैठका सुरु आहेत. मात्र, यावर अद्याप तरी तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यावर ठाम आहेत. शासनाकडून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, संपात काही ठिकाणी फूट पडल्याचे दिसून आले. राज्यातील अनेक आगारातून एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र याला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचे समोर आले. काल, रविवारी सांगली जिल्ह्यातील मिरज आगारातून सुटलेल्या एसटीवर कोल्हापुरात दगडफेक झाल्याची घटना घडली. तर चालकाला बेदम मारहाण देखील करण्यात आली. यामुळे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.