रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.एस. टी. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी चालक कम वाहक पदभरती सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. चालक-वाहक पदांमध्ये ९०२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. ही भरती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण प्रदेशासाठी असणार आहे. येत्या काही वर्षात एस. टी. गाडीवर वाहक न नेमण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठीच महामंडळाकडून वाहकांची जबाबदारीही चालकांवरच दिली जाणार आहे.गतवर्षी महामंडळाने ७ हजार ९०० पेक्षा जास्त चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये पाच हजारपेक्षा कमी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहेत.
कागदपत्र तपासणी व अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वाहन चाचणीदेखील घेतली जाणार असून, त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून चालक कम वाहक हे पुढील वर्षात सेवेत हजर होण्याची शक्यता आहे.कोकण प्रदेशातील ३०५४ पदांच्या भरतीतील ९०२ पदे ही महिलांकरिता राखीव ठेवण्यात आली आहेत. या आधीच्या भरती प्रक्रियेत २४०० पदे राखीव होती. मात्र, केवळ ४४१ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, एकही महिला या पदासाठी पात्र ठरलेली नाही.
चालक पदासाठी अवजड वाहन वाहतुकीचा परवाना आवश्यक आहे. त्याशिवाय अवजड वाहतूक प्रमाणपत्रदेखील गरजेचे आहे. मात्र, या गोष्टींचा अभाव महिला उमेदवारांकडे असल्यामुळेच त्यांची निवड होऊ शकली नाही. आगामी भरतीत तरी चालक कम वाहक पदांसाठी महिला उमेदवारांची निवड होणार का?महिलांसाठी ९०२ जागा राखीवनूतन भरती ही कोकण प्रदेशासाठी आहे. मुंबईमध्ये ७०४, रायगडमध्ये ६९७, पालघरमध्ये ५२२, रत्नागिरीमध्ये ४२९, सिंधदुर्गमध्ये ४४२, ठाणे येथे २६० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात महिलांसाठी ९०२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत २१२, रायगडमध्ये २१०, पालघरमध्ये १५६, रत्नागिरीमध्ये १२८, सिंधुदुर्गमध्ये १३४, ठाणे येथे ६२ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे.