अरूण आडिवरेकररत्नागिरी : आपल्या नेहमीच्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण इतरांना कधी सांगत नाही, दुसºयांशी शेअर करत नाही. तशाच त्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोणाला शेअर करू नका किंवा सांगू नका. एखाद्याला काय सांगायचे आहे, काय माहिती द्यायची आहे याची जाणीव आपल्याला असते. जसे आपण आॅफलाईन आहोत तसेच आॅनलाईन राहा, असे आवाहन खंडाळा (जि. पुणे) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी केले.सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयातर्फे ट्रान्सफार्मिंग महाराष्ट्र या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायबर क्राईमबाबत माहिती देताना तुंगार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, बँक प्रतिनिधी धनेश जाधव, अॅड़ आयुधा देसाई उपस्थित होते. प्रास्ताविक प्रणय अशोक यांनी केले. यावेळी त्यांनी सायबर क्राईमबाबत प्रत्येकाने जागृत राहून, सायबर क्राईम रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी धनेश जाधव यांनी बँकेशी निगडीत बाबींवर प्रकाश टाकत सायबर क्राईमपासून सर्वांनी आपल्याला कसे रोखले पाहिजे, हे सांगितले. अॅड़ आयुधा देसाई यांनी सायबर क्राईम, क्राईम घडल्यास ठोठावण्यात येणारी शिक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यासाठी आपण काय केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी संजय तुंगार पुढे म्हणाले की, इंटनेटच्या माध्यमातून त्रास देण्याचे काम केले जात आहे. इंटरनेट येण्यापूर्वी तरूणींची छेडछाड व्हायची पण ती पाठलाग करून, कट्ट्यावर बसून, तिला भेटून व्हायची. पण आता इंटरनेटच्या माध्यमातून हा त्रास दिला जातो. त्यामध्ये त्रास देणारी व्यक्ती दिसत नाही.
नशा ही केवळ चरस, गांजा, दारू याची असते असे नाही तर विचारसणीचीदेखील नशा असते. कोणताही विचार अतिप्रमाणात दिला गेला तर त्याचा विस्फोट होऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावून विचार पेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे तुंगार यांनी सांगितले.
तुंगार पुढे म्हणाले की, इंटरनेटच्या माध्यमातून गुन्हे करणे सोपे आहे. पण गुन्ह्यांचा तपास करणे किचकट आहे. सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या पुढे दहा पावले चोरांना ठेवण्यात आले आहे, असे सांगितले. यापुढे समाजाविरोधातील गुन्हे आणखीन वाढणार आहेत. पुढील काळात क्राईम अजून सोपे होणार आहे. त्यामुळे समाज म्हणून आपण सावध होणे गरजेचे आहे.
देशाचा नागरिक म्हणून सायबर क्राईमकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पूर्वी ज्याच्याकडे आर्थिक ताकद तोच जगाचा राजा, असे म्हटले जात होते. पण यापुढे ज्याच्याकडे डाटावर कंट्रोल तोच जगाचा राजा असेल. त्यासाठी प्रत्येकाने आपला मोबाईल डाटा सांभाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.पोलिसांसोबत काम करासायबर क्राईमबाबत सर्वांनीच जागरूक राहणे गरजेचे आहे. आताच्या तरूणांना इंटरनेटची माहिती आमच्यापेक्षा अधिक आहे. सोशल मीडियावर घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. समाजविघातक घडणाऱ्या घटनांची पोलिसांना माहिती द्या.सायबर क्राईमच्या कामात पोलिसांना मदत लागल्यास तुम्ही ती द्या. त्यासाठी सायबर क्राईमच्या कामात पोलिसांसोबत काम करा. तुम्ही पोलिसांचे कान, नाक, डोळे व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.नायझेरियन फसवणूक मोठ्या प्रमाणातलॉटरी किंंवा नोकरी लागली, असे फसवे एसएमएस पाठवण्याचे प्रकार नायझेरियामधून सर्वाधिक होतात. हे प्रमाण ३० टक्के आहे. तर बँकेतून बोलतोय, असे सांगून फसवणूक होण्याचे प्रमाण २५ टक्के व डेबिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण २० टक्के आहे.इंटरनेट हे धारधार ब्लेडसारखेइंटरनेट किंवा मोबाईलचा वापर करणाऱ्यांची सर्व माहिती त्यामध्ये जमा होत असते. ही माहिती पुसली जात नाही. नेटवर कोणतीही ओळख कधीही लपत नाही. आपली ओळख लपली की मनातील राक्षस जागा होतो.जिथे पैसा आहे तिथे गुन्हेगार जाणारपैसा, स्त्री आणि नशा या तीन गोष्टी गुन्हे करण्यास भाग पाडतात. या सर्वांना ह्यथ्री डब्ल्यूह्ण ही म्हणतात. जिथे पैसा आहे, तिथे गुन्हेगार जाणार. बँकेवर दरोडा टाकणारा माणूस बँकेत पैसे ठेवलेले असतात म्हणून तिथे चोरी करायला जातो. हाच पैसा आता तुमच्या एटीएम आणि डेबिट कार्डवर असल्याने चोर त्याकडे वळले आहेत. तुमचा एटीएम नंबर, पीन नंबर, ओटीपी कोड किंवा तुमच्या बँक खात्याबाबतची कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका किंवा सांगू नका, असे आवाहनही संजय तुंगार यांनी केले.सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापूर्वी विचार कराआपण एखादी गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केली व ती कितीही मिटवण्याचा प्रयत्न केला तरी मिटत नाही, हे साऱ्यांनीच लक्षात ठेवावे. पोस्ट करण्यापूर्वी दहावेळा विचार करा, एकदा पोस्ट झाली की त्याला माफी नाही.